Nashik Onion Issue :  शेतकरी आंदोलनांनंतर (Farmers Protest) गेल्या सोमवारी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी लासलगाव  (Lasalgaon) येथे नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप लासलगाव बाजार समितीत नाफेडचे केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नाफेडच्या माध्यमातून प्रत्यक्षात बाजार समितीत कांदा खरेदी करण्यासोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहात केली.


छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज सभागृहात नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीबाबत वस्तुस्थिती सभागृहासमोर ठेवत सत्यता मांडली. ते म्हणाले की, नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी ही काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या व व्यापाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात कुठलीही वाढ झालेली नसून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे नाफेडच्या माध्यमातून प्रत्यक्ष बाजार समितीत लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन खरेदी करण्यात यावी. त्यामुळे लिलाव प्रक्रियेतून शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळू शकणार आहे. तसेच त्यातूनही जर योग्य भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शासनाने ताबडतोब पाऊल उचलून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी सभागृहात केली.


यावर उत्तरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, कांदा खरेदीसाठी नाफेड मार्फत राज्यात एकूण दहा केंद्र सुरु करण्यात आले असून सद्या तीन फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 18 हजार 743 क्विंटल कांदा खरेदी करण्यात आला आहे. भुजबळांच्या मागणीवर ते म्हणले की, नाफेड बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष कांदा खरेदीमध्ये सहभाग घेईल तसेच कांदा शेतकऱ्यांना अनुदान देणे विचाराधीन आहे. समितीच्या अहवालानंतर लवकरच याबाबत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अनुदान घोषित करण्यात येईल. याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करण्यात येईल अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.


नाफेडमार्फत अद्याप खरेदीची प्रतीक्षाच.... 


एकीकडे गेल्या सोमवारी शेतकरी आंदोलनांनंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी लासलगाव येथे नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप लासलगाव बाजार समितीत नाफेडचे केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याच सुमारास मंत्री भारती पवार यांनी देखील नाशिक जिल्ह्यतूल नाफेडने कांदा खरेदी केल्याचे म्हटले होते. मग नेमकी नाफेडकडून कोणत्या ठिकाणी कांदा खरेदी सुरु आहे, हे स्पष्ट करावे अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे. ज्या ठिकाणाहून नाफेडकडून कांदा खरेदी केला जात आहे, त्या ठिकाणी मागील चार ते पाच दिवसात पाचशे ते सातशे टन खरेदी झाल्याचे समोर आले आहे. तसेच नाफेडने हा कांदा सात ते आठ रुपये किलोने दाराने खरेदी केला आहे.