Maharashtra Nashik igatpuri Fire : :  कोळशाची गाडी घेऊन गेलो असता अचानक स्फोट झाला, त्या स्फोटान भीतीनं गाळणच उडाली. लागलीच गाडी तशीच फिरवून जिवाच्या आकांताने कंपनीबाहेर पळालो, इतर कामगारांना सावध केलं अन् जीव वाचविृला,  कंपनीत काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शी कामगारांनी थरकाप उडवणारा अनुभव कथन केला.

 

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पॉलिफिल्म जिंदाल कंपनीला भीषण आग लागली. आगीची घटना घडली तेव्हा काही कामगार कोळशा घेऊन कंपनीत गेले होते. यावेळी त्यांनी हा थरारक प्रसंग अनुभवला व तेथून पळ काढला. यातील एक प्रत्यक्षदर्शी कामगार अनुभव कथन करतांना म्हणाला की, आम्ही सकाळी पावणे अकराच्या सुमारास कोळशाची गाडी घेऊन पोहचलो. आमच्यासोबत इतरही वाहने इथं उभी होती. कोळशाची गाडी खाली करत असताना बॉयलर हिट होऊन मोठा स्फोट झाला. 

 

स्फोट झाला तेव्हा आम्ही सुद्धा हादरलो, काही क्षणात गाडी लावलेल्या दरवाजात आगीचे लोळ उठले. दरवाजातून अनेक कामगार भाजलेल्या अवस्थेत बाहेर पडल्याचे पाहिले, अन् अंगावर काटा उभा राहिला. क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. आम्ही सर्वजण खूपच घाबरलो. घाबरलेल्या अवस्थेत इतर कामगारांना बाहेर पडा असं सांगून आम्ही कोळसा खाली न करता बाहेर पडलो. 

 

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जेव्हा स्फोट झाला, अस वाटलं एखादं बॉम्ब फुटला की काय? स्फोट झाल्यानंतर आग लागली. जवळसपास तीस ते 35 गाड्या होता, सर्वांना गाडी कंपनीबाहेर काढण्यास सांगून कंपनीबाहेर पळ काढला. आग लागली त्या प्लॅन्टमध्ये असंख्य कामगार काम करतात, मात्र धूर एवढा होता की किती वाचले, हे सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले. 

 

आग लागली त्या प्लॅन्टमध्ये जास्त महिला असून दरवाजात आग लागल्याने अनेक कामगार फसले असल्याचे ते म्हणाले. जेवढे कामगार प्लॅन्ट मध्ये असतील त्यातील एकही कामगार वाचणार नाही, अशा शब्दांत भीषण आगीचे वास्तव या कामगारांनी व्यक्त केले. तर एकजण म्हणाला की स्फोटचा आवाज ऐकूनच काळीज बाहेर येत की काय? अस वाटलं, जेव्हा आम्ही गाडी घेऊन बाहेर आलो, तेव्हा वाटलं आपण वाचलो म्हणून... आग एवढी होती की आग लागलेल्या प्लॅन्टमध्ये एकही कामगाराला बाहेर पडता येणार नाही, अशी अवस्था होती, ते आठवूनच काळजात धस्स होत असल्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग उभा केला.

 

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात झालेल्या भीषण आगीत जखमी झालेल्या दोघा महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 


 

ही बातमी देखील वाचा