Nashik Fire:  नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri) कंपनीला भीषण (Nashik Fire) आग लागली आहे. ही आग प्रचंड असून परिसरात धुराचे लोट उसळले आहेत. जिंदाल पॉलिफिल्म्स (Jindal Polyfilms) या कंपनीला आग (Fire) लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत काही कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळ असलेल्या जिंदाल पॉलिफिल्म्स या कंपनीला आग लागल्यानंतर मोठे स्फोट ऐकू आले. कंपनीत असलेल्या रसायनांचा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काहींच्या मते हा स्फोट बॉयलरचा झाला असल्याचे सांगण्यात येते. आगीचे नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. आग भीषण असून प्रचंड धुराचे लोट उसळले आहे. महामार्गावरूनदेखील या आगीच्या धुराचे लोट दिसत आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत एक हजारांहून अधिक कामगार काम करतात. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. कंपनीत अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगीची माहिती समजताच अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील केमिकल स्टोरेजला आग लागली आहे. या आगीत काही जण जखमी झाले आहेत. 11 जणांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. आगीत कितीजण अडकले याबाबत नेमका आकडा समोर आला नाही. सध्या अग्निशमन दलाचे आठ बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिकादेखील दाखल झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.


स्फोटानंतर कंपनीचे पत्रे उडाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. स्फोटामुळे जवळपासच्या गावांना हादरे बसले असल्याचे काहींनी म्हटले. सकाळी लागलेल्या आगीनंतर दुपारीदेखील स्फोटाचे आवाज ऐकू येत होते.  



पाहा व्हिडिओ: Nashik Fire  नाशिकमध्ये  इगतपुरीतल्या मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत मोठी आग : ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या: