Happy New Year Nashik : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघा एक तास शिल्लक असून जगभरात स्वागतासाठी नागरिक उत्सुक आहेत. तर दुसरीकडे 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी मद्य प्राशन न करता दूध प्राशन करून थर्टी फस्ट साजरी करण्याची संकल्पना नाशिकमध्ये अंनिसने (Nashik Andhshraddha Nirmoolan Samiti) मांडली.
31 डिसेंबर साजरा करताना अनेकजण मद्य प्राशन करतात, कुठे पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अशाने तरुण पिढी बिघडत असून तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला मद्य प्राशन करण्याचे टाळावे, त्या ऐवजी दूध प्राशन करावे असा सल्ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील विविध ठिकाणी दूध वाटप करण्यात आले.
'द दारूचा नव्हे तर द दुधाचा' प्रबोधन कार्यक्रम
सरत्या वर्षांला निरोप देतांना व नववर्षाचे स्वागत करतांना मद्याच्या आहारी जाऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले. या निमित्ताने हुतात्मा स्मारक समोर 'द दारूचा नव्हे तर द दुधाचा' प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. नाशिककरांना मद्याचे दुष्परिणाम पटवून देत मोफत मसाला दुधाचे वाटप केले. यावेळी 'चला व्यसनाला बदनाम करू या ' ' नो विस्की नो बिअर हॅपी न्यू ईअर हॅपी न्यू ईअर' अशा घोषणा देण्यात आल्या.
त्याचबरोबर नववर्षाचे स्वागत फटाके फोडून व प्रदुषणाने करू नका, नववर्ष धुंदीत नव्हे तर शुद्धीत साजरे करा ,असे आवाहनही करण्यात आले. या अनोख्या प्रबोधन कार्यक्रमाचे लोकांना कौतुक वाटले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डाॅ.टी.आर.गोराणे, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री, ॲड समीर शिंदे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, विजय खंडेराव, दिपक वर्दे, नितीन बागुल आदी कार्यकर्त उपस्थित होते.
आपकडूनही दुधाचे वाटप
दरम्यान नाशिक आम आदमी पक्षाकडून (Aam Aadmi Party Nashik) नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात दूध वाटप करण्यात आले. थर्टी फस्ट ला हजारो नागरिक हॉटेल्स रिसॉर्ट ला जाऊन धिंगाणा घालतात. यावर बंदी आणली पाहिजे. थर्टी फस्टच्या रात्री तरुण व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक भागात अपघात घडण्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळे मद्य प्राशन न करता तरुणांनी दुधाचे प्राशन करावे असे आवाहन आपकडून करण्यात आले.
ही बातमी देखील वाचा