Nashik Bus Accident: नाशिकमध्ये आज पहाटे खासगी बसला लागलेल्या आगीत (Nashik Bus Fire) 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पहाटेच्या सुमारास बसमधील अनेक प्रवासी झोपेत असतानाच बसला अपघात (Nashik Bus Accident) झाल्याने आग लागली. अचानक लागलेल्या आगीने प्रवाशांना नेमकं काय घडलं  हेच कळले नाही. बसला आग लागली असतानादेखील एका तरुणाने आतेबहीण आणि तिच्या दोन मुलांची प्रसंगावधान राखत सुखरूप सुटका केली. एबीपी माझाशी बोलताना या तरुणाने बसमधील भीषण परिस्थिती सांगितली.


यवतमाळहून ही बस मुंबईच्या दिशेने निघाली होती. नाशिकमधून ही बस मुंबईच्या दिशेने येत असताना बस आणि ट्रेलर ट्रकचा अपघात झाला. मिर्ची हॅाटेल जंक्शनवर झालेल्या अपघातात लक्झरी बसची ट्रकच्या केबीनच्या मागे धडक बसल्याने बसने पेट घेतला असल्याची माहिती आहे. अपघातातून सुखरुप बचावलेल्या गणेळ लांडगे यांनी प्रसंगावधान राखत स्वत: सह आतेबहीण आणि तिच्या दोन मुलांचे प्राण वाचवले. 


खिडकीतून उडी मारली आणि बचावलो


गणेश लांडगे यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितले की, वाशिमपासून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली होती. अपघाताच्या एक-दीड तासापूर्वी बसने थांबा घेतला होता. त्यामुळे प्रवाशी झोपी गेले होते. अचानकपणे बसचा अपघात झाल्याचा आवाज आल्याने काहीजण उठले. बसला समोरून आणि मागील बाजूने अचानकपणे आग लागली. आग लागली असताना बसमधून बाहेर पडण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, दरवाजाजवळ प्रवाशांची गर्दी झाली होती. मोठा गदारोळ उडाल्याची स्थिती होती. आगीमुळे बसमधून बाहेर पडता येत नव्हते. अखेर या स्लीपर बसमधील अप्पर सीटच्या खिडकीतून आतेबहीण, मुलांना बाहेर काढले. त्यानंतर आपण त्या बसमधून बाहेर पडलो असल्याचा थरारक अनुभव प्रवासी गणेश लांडगे याने सांगितला.


माणसं जळताना पाहिली...मुल बचावलं


गणेश लांडगे यांची आतेबहीणीनेदेखील या घटनेचा अनुभव सांगितला. बसला आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला होता. जळत्या बसमधून बाहेर पडण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. माझा मुलगादेखील मोठ्या माणसांमध्ये दबला गेला होता. त्यातून बाहेर पडत असताना तो त्या ठिताणी पडला. अखेर त्याला मागे घेतले. हा सगळा प्रसंग भयंकर होता. माझ्या डोळ्यांसमोर माणसं आगीत जळताना पाहिली. थोडक्यात आम्ही बचावलो असल्याचे त्यांनी सांगितले. 


पाहा व्हिडिओ: Nashik Bus Fire : मृत्यूच्या दाढेतून स्वतःसह बहीण, 2 लहान मुलांना वाचवलं, थरारक अनुभव EXCLUSIVE