Nashik Potholes : मागील काही महिन्यापासून नाशिक (Nashik) शहरातील खड्डयांनी नाशिककर बेजार झाले असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. अशातच रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात नाशिककरांनी अनेक वेळेस आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनांच्या विरोधात संतापही व्यक्त केला. कायम वेगवेगळी आंदोलनही छेडण्यात आली. मात्र अद्यापही परिस्थिती जैसे थे आहे, त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा नाशिक महापालिकेसमोर खड्डे कवी संमलेन पार पडले. 


नाशिक शहरात यंदाच्या पावसाळ्यात (Rain) रस्त्यांची दैना झाली असून रस्ते कमी अन खड्डेच जास्त दिसू लागले आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून नाशिककर वैतागले असून आता प्रशासनाला जाब विचारणे देखील सोडून दिले आहे. सुरवातीला अनेक संस्था, संघटनांनी, नागरिकांनी खड्ड्यांवर आवाज उठवला. त्यानंतर काही अंशी खड्डे बुजविण्याचे कामकाजाला सुरवातही झाली. मात्र आजही खड्डे आ वासून रस्त्यात उभे आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून स्मार्ट कवी खड्डे संमेलन भरविण्यात आले होते. त्या स्पर्धेचा आज निकाल लावत पुन्हा स्मार्ट कमी खड्डे संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 


नाशिक शहरातील खड्डे न बुजवल्याने आज पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर चक्क स्पर्धेतील फोटो लावत विजेत्या स्पर्धकांना याच ठिकाणी बक्षीसही देण्यात आले आहेत. यावेळेस भाकपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कविताही सादर केल्या. नाशिककरांचा कष्टाचा पैसा पालिका प्रशासन खड्ड्यात घालत असल्याचा हा आरोप यावेळेस भाकपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. शहर खड्डे मुक्त होत नाही, तोपर्यंत वेगवेगळे उपक्रम आम्ही चालूच ठेवणार असे देखील या वेळेस सांगण्यात आल आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ऑगस्ट 2022 पासून या नाशिक शहरांमध्ये जे खड्डे पडले, त्याने खड्ड्याच्या मागचं जे राजकारण आहे. या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष सातत्याने मोहीम करत आहे. 


नाशिक हे स्मार्ट सिटी असं म्हटलं जातं. करोडे रुपये खर्चून स्मार्ट सिटी बनवत आहेत, मग रस्ते का खराब झाले याचे उत्तर मिळत नाही. म्हणून जे अधिकारी खड्ड्याचा पूर्णत्वाचा दाखला देतात, त्या अधिकार्‍यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ज्या नगरसेवकाच्या वार्डमध्ये हे काम झाले आहेत, त्या खड्ड्याच्या वरती नगरसेवकांचे नाव दिलं पाहिजे. या सर्व मागण्या घेऊन आम्ही नाशिककरांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत. यापूर्वी देखील कवी संमेलन झाले असून, आज सुद्धा कवी संमेलन पार पडले. याच शहरात पडलेल्या खड्ड्यांवर चित्रकला स्पर्धा स्मार्ट खड्डे कवी संमेलन अशा अनोख्या स्पर्धाही घेण्यात आल्या मात्र तरी देखील प्रशासनाने शहरातील खड्डे अद्यापही बुजवलेले नाहत. कवींनी या संमेलनाच्या माध्यमातून सरकार आणि महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याचंही बघायला मिळालं.


नाशिककरांना जागृत करत आहोत आपला कष्टाचा पैसा ज्या पद्धतीने वाया जातो त्या संदर्भात सर्व जनतेने जाम विचारावा आणि खड्डे मुक्त नाशिक होण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन भारतीय पक्ष नाशिक शहराच्या वतीने करीत आहोत. नाशिक मधील रस्त्यांची दुरावस्था ही अद्यापही बदललेली नाही आहे. किमान आता दिवाळीच्या तोंडावर तरी शहरातील खड्डे बुजवून नाशिककरांचा प्रवास सुखकर करावा अशी नाशिककरांची अपेक्षा असल्याचे पदाधिकारी राजू देसले यांनी सांगितले.