Nashik Latest Marathi news : दोन दिवसांपूर्वी राज्यातील ग्रामपचंयत निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये नाशिकमधील सुरगाणा ग्रामपंचायतीमध्ये काजल गुंबाडे या सरपंच म्हणून निवडून आल्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते पण दोन दिवसांतच गुंबाडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. कारण काजल गुंबाडे यांचे पती आणि वीज कर्मचारी गणेश गुंबाडे यांचा कामावर असताना वीजेचा धक्का लागून मृत्यू झालाय. त्यामुळे गुंबाडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. 


नाशिकच्या सुरगाणा येथे ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. वीज वितरण कंपनी मध्ये कंत्राट पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना  घडली. गणेश सिताराम गुंबाडे असे या वीज कर्मचाऱ्याचे नाव आहे. आज सायंकाळ पासून नाशिकसह जिल्ह्यातील काही भागांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच सुरगाणा शहरात कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून आज दुपारच्या सुमारास मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुंबाडे हे सुरगाणा शहरातील महाविद्यालय जवळील एका सिमेंट खांबावर चढून काम करत होते. तत्पुर्वी विद्युत प्रवाह  बंद करण्यात आला होता. मात्र जवळूनच गेलेल्या बोरगांवची 11 केवी मधील विद्युत प्रवाह सुरू होता. काम करत असताना जवळून गेलेल्या वाहिनीतून विद्युत प्रवाह सुरू असल्याचे लक्षात न आल्याने या वाहिनीचा त्यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी काजल ह्या नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.


गुंबाडे हे अनेक वर्षांपासून सुरगाणा शहर परिसरात लाईटशी संबंधित कामकाज पाहत असल्याने संपुर्ण सुरगाणा शहराला परिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. त्यांचे पश्चात पत्नी, एक लहान मुलगी आई, वडील, दोन भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.


शेतकऱ्याचा मृत्यू
सुरगाणा तालुक्यातील घागरबुडा येथे बुधवारी साडेचार वाजेच्या दरम्यान शंकर भावडू पवार हे शेतामध्ये गुरे चारत असताना त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बोरगाव येथील मंडळ अधिकारी सी. गवळी व हतगडचे तलाठी प्रकाश कडाळी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला. सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.