Nashik News : एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याच्या कामाची दखल घेत काही दिवसांपूर्वी महावितरणने (Mahavitaran) आदर्श कर्मचारी म्हणून गौरव केलेल्या एका कर्मचाऱ्यावर सध्या अत्यंत वाईट वेळ आली आहे. हा कर्मचारी गंभीर अवस्थेत जखमी असून आर्थिक मदतीसाठी त्यांच्या कुटुंबासह मित्र मंडळींवर सोशल मिडीयाच्या (Socail Media) माध्यमातून आवाहन करण्याची परिस्थिती ओढावली आहे.

  
 
ऐन पावसाळ्यात स्वतःचा जीव धोक्यात घालत महावितरणचे कंत्राटी कर्मचारी कशा पद्धतीने कामं करतात. याचा एक थरारक व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाला होता. नाशिकच्या (Nashik) ईगतपुरी तालुक्यातील अमोल जागले (Amol Jagle) या कर्मचाऱ्याने रायंबे गावी खंडित झालेला वीजपुरवठा (Power Supply) सुरळीत करण्यासाठी मुकणे धरणातील (Mukane Dam) पुराच्या पाण्यात पोहत जाऊन खांबावर चढून वीजपुरवठा पूर्ववत केला होता. यासाठी त्याने जीव धोक्यात घालूं विद्युत पुरवठा सुरळीत केला होता. या कार्याची दखल घेत महावितरणकडून पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आदर्श कर्मचारी म्हणून अमोलचा गौरवही करण्यात आला होता. मात्र जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या याच अमोलचा दोन दिवसांपूर्वी कर्तव्यावर असतांना भीषण अपघात झाला आहे. 


एका कंपनीच्या उच्च दाबाच्या पोलवरील लाईनचे काम करत असतांनाच विजेचा धक्का बसल्याने तो या पोलवरून थेट खाली कोसळला. सध्या त्याच्यावर नाशिक शहरातील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अमोलचा डावा पाय पूर्ण निकामी झाला असून बुधवारी शस्त्रक्रियाही पार पडली आहे. तसेच पोट आणि कंबरेलाही गंभीर जखम झाली आहे. अमोलच्या घरची परिस्थिती हलाखीची असून उपचाराचा खर्च हा परवडणारा नसल्याने आर्थिक मदतीसाठी मित्र मंडळी आणि गावकऱ्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. 


विशेष म्हणजे ज्या महावितरण कंपनीसाठी अमोल जिवाजी बाजी लावून काम करत होता. त्याच अमोलला महावितरणकडून कुठलीही आर्थिक मदत करण्यात आलेली नाही आणि यामागील कारण म्हणजे अमोल हा कंत्राटी स्वरुपात काम करणारा कर्मचारी आहे. वैयक्तिक किंवा काही संघटनांच्या माध्यमातून आम्ही मदतीसाठी प्रयत्न करतोय असं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 


अमोल हा इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील काळुस्ते गावचा रहिवासी आहे. अमोलचे वडील 1998 सालीच हे जग सोडून निघून गेले आहेत, आई गृहिणी आहे तर अमोलचा मोठा भाऊ हा खासगी नोकरी करतो. अपघातामुळे अमोलच्या भविष्याचाही प्रश्न आता निर्माण झाल्याने महावितरणने त्याला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आगामी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी म्हंटल आहे. 


एकूणच फक्त अमोल जागलेच नाही तर त्याच्यासारखे अनेक कंत्राटी कर्मचारी हे महाराष्ट्रात जबाबदारी आणि मेहनतीने काम करत आहेत. कामाच्या बदल्यात त्यांना मिळणारा मोबदला तर कमीच आहे, मात्र निदान कोणावर अमोल सारखी परिस्थिती ओढावल्यास अशावेळी तरी सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे गरजेचं आहे.