नाशिक : लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या. आपल्या शासनाचे घ्यायचे आणि त्यांचे गायचे, असे चालणार नाही. अनेक ताया महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नको, आम्हाला सुरक्षा पाहिजे, असे म्हणत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केले. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धनंजय महाडिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, या भारतीय जनता पक्षाचं फार आदर आणि प्रेम आहे. त्यांनी कुटुंबाला मदत व्हावी, या उदात्त हेतूने योजना सुरु केलेली नाही. ही योजना फक्त तीन महिन्यांसाठी आहे. फक्त निवडणुकीचे मतदान होईपर्यंत ही योजना आहे. त्यामुळे या धमक्या दिल्या जात आहेत की काँग्रेस आणि शिवसेनेच्या रॅलीमध्ये कोणी महिला दिसल्या की त्यांचे फोटो काढा. इतर धमक्याही दिल्या जात आहेत. महिलांना दबावाखाली आणले जात आहे.
1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार
हे फक्त 1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या जाहीरनाम्यातील पंचसूत्रीत त्यात आम्ही महिलांसाठी महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे. तीन हजार रुपये आम्ही महिलांना देऊ. आम्ही कुणाचे फोटो काढणार नाही. ही योजना समस्त महिला वर्गासाठी आहे. मतं द्या किंवा नका देऊ यासाठी या योजना नसतात, महिलांच्या भविष्यासाठी या योजना असतात.
हा तीन महिन्यांचा खेळ
आमच्या सरकारचा फायदा करून घ्यायचा आणि गुणगान दुसर्यांचे गायचे, असे देखील महाडिक यांनी म्हटले. याबाबत संजय राऊत म्हणाले की, सरकार कुणाच्या बापाचे नाही, सरकार जनतेचे असते. आपण कुठल्या पक्षातून कुठे गेलात? किती पक्ष बदलले? यांनी आधी आपला इतिहास बघावा. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि फडणवीसांच्या घरातून हे पैसे येत नाहीत. जनतेच्या करातील तुम्ही जनतेला देत आहात आणि दादागिरी कोणाला करत आहात? 1500 रुपये तुम्ही देताय, सिलेंडर 1400 रुपयांना मिळत आहे. म्हणून आम्ही महालक्ष्मी योजना तीन हजार रुपयांची करत आहोत. निवडणूक काळात अशा धमक्या महिलांना दिल्या जातील. महिला दुर्लक्ष करताय, त्यांना माहितीये हा तीन महिन्यांचा खेळ आहे. त्यांना महालक्ष्मी योजनेचीच मदत मिळणार आहे.
आणखी वाचा