Praniti Shinde: राज्यभरात निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच खासदार प्रणिती शिंदे यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारादरम्यान एका सभेत महिलांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या सभेत किंवा रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो आम्हाला पाठवा. आम्ही त्यांची व्यवस्था करू असं वक्तव्य महाडिकांनी केलं होतं. त्या वक्तव्याचा समाचार घेत, अशा मानसिकतेची लोक भाजपमध्ये आहेत, असा हल्लाबोल प्रणिती शिंदे यांनी केला आहे. लाव रे तो व्हिडिओ म्हणत प्रणिती शिंदे यांनी कोल्हापुरात येऊन महाडिक यांचे ते भाषण दाखवलं आहे.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, आपली पुढे जाणारी संस्कृती मागे खेचली जाते. भाजपच्या एका नेत्याने इतक्या खालच्या पातळीत भाषण केलं. ते तुम्हाला पाहून त्यांची किव येईल. ज्या पध्दतीचं त्यांनी भाषण केलं, महिलांना तुच्छ समजणारं असं भाषण भाजपच्या नेत्याने केलं आहे. यावेळी त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा तो व्हिडिओ देखील दाखवला आहे.
काय म्हणालेत खासदार धनंजय महाडिक?
ज्या महिला पंधराशे रूपये आपल्या योजनेचे घेतात त्यांचे फोटो काढून घ्या. त्यांची नावे पण घ्या. जर इथं काँग्रेसची रॅली निघाली. त्यामध्ये जर तुम्हाला या महिला दिसल्या. ज्या पंधाराशे रूपये आपल्या योजनेचे घेतात. फोटो काढून घ्या, त्यांची नावे लिहून घ्या. घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. काही महिला म्हणतात. आम्हाला पैसे नकोत, सुरक्षा पाहिजे, राजकारण करता या पैशांचं, काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर त्यांचे फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या कर त्यांचे फोटो काढायचे. फोटो आमच्याकडे द्या आम्ही व्यवस्था करतो त्यांची, असं खासदार धनंजय महाडिक व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.
काय म्हणाल्या खासदार प्रणिती शिंदे?
निषेध आहे याला, कोणत्या पध्दतीची भाषा आहे ही, अर्धा तासांपुर्वी त्यांनी हे म्हटलं आहे. ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी भाषा आहे का? कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा. आम्हाला फोटो द्या आम्ही व्यवस्था करतो, इतकं तुच्छ, घ्या आमचे फोटो. बिनधास्त फोटो घ्या, बघुया तुम्ही काय बिघडवता आमचं, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी खासदार धनंजय महाडिक यांना खुलं आव्हान दिलं आहे.