नाशिक : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा दिला होता. यानंतर विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) स्वबळावर लढण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. राज्यातील अडीचशे मतदारसंघांमध्ये राज ठाकरेंनी चाचपणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून आता विभागनिहाय दौरे सुरू आहेत. मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंनी आपला मोर्चा उत्तर महाराष्ट्राकडे (North Maharashtra) वळवला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगणार आहे. तर राज ठाकरेंनी मात्र 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. उद्यापासून दोन दिवस राज ठाकरे नाशिक (Nashik News) दौऱ्यावर येत असून ते उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहे.
राज ठाकरे उद्यापासून नाशिक दौऱ्यावर
मनसेची स्थापना झाल्यानंतर सर्वाधिक तीन आमदार नाशिकमधून निवडून आले होते. त्यामुळे नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला बनला होता. नाशिक महापालिकेत सत्ता आणि तीन आमदार अशी भक्कम स्थिती मनसेची होती. मात्र, गटबाजीमुळे मनसेला मोठा धक्का बसला आणि मनसेचा नाशिकची सत्ता गेली. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पुन्हा आपला मोर्चा नाशिककडे वळवला आहे. त्यासाठी दोन दिवस ते नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी पक्षाच्या नेत्यांकडून सुरू झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात एकूण 47 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निहाय आढावा राज ठाकरे घेणार आहे.
महत्त्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश होणार
याबाबत मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्यापासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरेंच्या दौऱ्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका नाशिकमध्ये होणार आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. इच्छुक उमेदवारांच्या बैठका झाल्यानंतर अंतिम निर्णय राजसाहेब घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यात महत्त्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील सुदाम कोंबडे यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या