Nashik Chhagan Bhujbal : भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद मुस्लिम देशांमध्येही उमटत आहेत. मात्र नूपूर शर्मा म्हणजे संपूर्ण भारत नव्हे, असे स्पष्ट मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. 


नूपूर शर्मा यांनी काही दिवसांपू्र्वी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य टीव्ही वाहिनीवरील चर्चेत केलं होतं. त्या वक्तव्यामुळं भाजपनं नूपूर शर्माचं प्राथमिक सदस्यत्त्व रद्द केलं आहे. नूपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर विविध संघटनांनी संताप व्यक्त केला होता. आता या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी मौन सोडले आहे. ते म्हणाले कि, आपल्या संविधानात प्रत्येक धर्माचा मान राखावा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माबाबत कोणीही अद्वातद्वा बोलू नये. तसेच एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्याची शिक्षा विदेशात राहणाऱ्या वा विदेशात आपले उत्पादन विकणाऱ्या इतर भारतीय नागरिकांना मिळू नये, त्यांना त्रास होऊ नये, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली. 


दरम्यान नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजपचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. या वादाला शांत करण्यासाठी भाजपने या संदर्भात एक पत्रक जारी केले असून 'आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करतो. कोणत्याही धर्मातील महामानवासंदर्भातील अपमानास्पद वक्तव्य स्वीकारली जाणार नाहीत,' असं भाजपकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले गेले आहे. तर पुढे भुजबळ म्हणाले कि, एखाद्या पक्षातील माथेफिरू लोक केवळ प्रसिद्धीसाठी अशी चुकीची वक्तव्ये करतात. भारत सरकार मुस्लिम देश, मुस्लिम संघटना यांच्याशी चर्चा करून मार्ग काढेल अशी आशा वाटते, असेही भुजबळ म्हणाले. 


विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसावी लागेल!
विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या प्रत्येकी दोन जागा व भाजप पक्षाच्या चार जागा रिक्त आहेत. एकूण दहा जागांसाठी उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. मात्र भाजपने चारऐवजी पाच उमेदवार जाहीर केले असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कंबर कसावी लागेल, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी मांडले. राज्यसभेच्या निवडणुकीतही एक उमेदवार अधिक असल्यामुळे सर्व पक्षांची तयारी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.  


या दोन्ही निवडणुकींसंदर्भात मंगळवारी महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष व मित्र पक्षांची बैठक मुंबई येथे पार पडली आहे. या बैठकीत आम्ही सर्वजण एकत्र राहून राज्यसभेवरील आमचे उमेदवार निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला गेला. तसेच विधान परिषदेवर सुद्धा आमचे उमेदवार निश्चित निवडून येतील. विधान परिषद निवडणुकीसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अशी कोणतीही घटना घडणार नाही, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.