Gautami Patil : आपल्या दिलखेचक अदांनी तरुणांना घायाळ करणारी, राज्यभर प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल्ल गर्दी खेचणारी गौतमी पाटील (Gautami Patil) पुन्हा एकदा वादात सापडली आहे. आता तिच्या आडनावावरून वाद निर्माण झाला असून गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होते, त्यामुळे तिने पाटील नाव वापरू नये अशी मागणी एका मराठा संघटनांकडून (Maratha Sanghatana) करण्यात आली आहे, तर 'मी पाटीलच आहे आणि हे नाव मी वापरणारच', आपण मागे हटणार नसल्याचा इशारा गौतमी पाटीलने दिला आहे. 


राज्यात गेल्या वर्ष दीड वर्षभरापासून सर्वाधिक चर्चेत कोणी असेल ती गौतमी पाटील.. गौतमी पाटील आणि वाद यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. जिथे गौतमी आहे, तिथे वाद आहे. आता गौतमी पाटील पुन्हा एका नव्या वादात अडकली आहे. मात्र यावेळेस वाद तिच्या नृत्याचा नाही तर वाद आहे, तिच्या आडनावाचा आहे. 'मी पाटीलच आहे आणि हे नाव मी वापरणारच', माझ्याबद्दल कोणी काहीही बोलले तरी, मला काही फरत पडत नाही.' 'मी जे कार्यक्रम करते ते, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.' माझे हे कार्यक्रम चांगले पार पडत आले आहेत, असे गौतमीने म्हटले आहे.


'सबसे कातिल गौतमी पाटील' अशी टॅग लाईन गौतमीच्या बाबतीत वापरली जाते, मात्र यातील पाटील आडनावालाच मराठा संघटनांनी विरोध केला आहे. पुण्यात (Pune) गौतमीच्या आडनावाच्या वादावरून नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत गौतमीचे आडनाव पाटील नसल्याचा दावा करण्यात आला आहे. 'गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करते आहे. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही', असा थेट इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला आहे. यावर आपल्या प्रतिक्रियेद्वारे आपण मागे हटणार नसल्याचे गौतमीने स्पष्ट केले आहे. 


मराठा समाजातील प्रश्नाकडे लक्ष द्या.... 


गौतमी पाटील यांनी पाटील आडनाव लावू नये, या विषयावर पुण्यातील एका मराठा संघटनेने आक्षेप घेतला आहे. मात्र जळगावमधील मराठा संघटनेकडून त्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला असून गौतमीच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. मराठा सेवा संघ माजी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पाटील म्हणाले कि, पाटील हे नाव एखादा समाजेपुरते मर्यादित नसून गाव सांभाळणारा प्रमुख त्याला पाटील ही पदवी देण्यात आली होती. गौतम पाटील एक चांगली कलाकार असून लोकशाहीमध्ये प्रत्येकाला नाव लावण्याचा अधिकार आहे. ती हुकूमशाही किंवा ठोकशाही नसून असे करणे चुकीचे आहे. गौतमी पाटील यांना धमकी देणाऱ्यांनी मराठा समाजात अनेक प्रश्न आहेत, याकडेही लक्ष घालावे. गौतमी पाटील यांचा आडनाव पाटील आणि मराठा समाजाची बदनामी होत आहे, असं मला पटत नसल्याचे सुरेंद्र पाटील म्हणाले. 


पाटील नाव लावू नये, असे म्हणणे मुळात वेडेपणा.... 


पाटील नाव लावू नये, असे म्हणणे मुळात वेडेपणा आहे. पाटील ही एक उपाधी असून पाटील, देशपांडे, कुलकर्णी, देसाई ही गाव सांभाळणारी माणसे होती.  पाटील हे आडनाव कुठल्याही जातीची मक्तेदारी नाही. गौतमी पाटील यांनी साधन सुचिता जपली पाहिजे, यात कुणाचे दुमत नाही. गौतमी पाटील यांच्या बाबतीत जर तुम्हाला साधन सुचिता जर सांगायची असेल तर तिच्या कार्यक्रमाला मराठा समाजातील मुलांनी जाऊ नये, कार्यक्रम घेणाऱ्यांनी आयोजन करू नये. कुठल्याही नावावरून गौतमी पाटीलला वेठीस धरणे हे चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून महिलांना सुरक्षा पुरवणे ही मराठा समाजाची जबाबदारी आहे, असे कुठलेही फालतू वाद निर्माण करून समाजाला बदनाम करु नका, असे आवाहन रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले आहे.  


कोण आहे गौतमी पाटील? 


गौतमी पाटील ही मूळची धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आहे. काही दिवसांपुर्वी गौतमीचा 'खान्देश कन्या' म्हणून गौरवही करण्यात आला आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला..लहानपणीपासूनच  गौतमीचा सांभाळ तिच्या मामाने केला. गेल्या अनेक वर्षांपासून गौतमी आई सोबत पुण्यात राहते. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडमध्ये तिचे आजोळ आहे. वृद्ध आजी आजोबा शिवाय तिचे जवळचे नातेवाईक तिथे कुणी राहत नाही, अशी स्थानिकांची माहिती आहे.