Nashik Chhagan Bhujbal : राज्यात कांदा, टोमॅटोचा (Onion Issue) दराचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच परदेशातून आले आहेत, तसेच ते खूप पॉवरफुल असून त्यांनी एक फोन केला, तरी कांदा प्रश्न मिटेल, असा उपहासात्मक टोला छगन भुजबळ यांनी मोदींना लगावला आहे. 


राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आज सकाळी नाशिकमध्ये (Nashik) होते. त्यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, सध्या कांद्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. कांद्याला भावच मिळेनासा झाला आहे. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. आपले पीएम मोदी (Narendra Modi) हे परदेश दौऱ्यावरुन भारतात परतले आहेत. ते खूपच पॉवरफुल असून त्यांच्या एका कॉलवर हा प्रश्न सुटणार असल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच समृद्धीचे आज उद्घाटन होते आहे, पण यावर होणाऱ्या अपघाताबाबत उपाययोजना करा, मुंबईशी कनेक्ट झाल्यावरच खरा फायदा होईल, मुंबईपर्यंत सुरु होत नाही, तोपर्यंत रहदारी वाढणार नाही. ट्रॅफिकपासून सुटका होईल, बाकी आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. 


तुमचा तमाशा आटोक्यात ठेवा.... 


छगन भुजबळ पुढे म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी नुकतीच महाविकास आघाडीवर टीका केली. यावर भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये बाहेर कीर्तन, आतमध्ये तमाशा असे नाही. तुमचा तमाशा आटोक्यात ठेवा. दोन पक्षात मतभेद होतात, तर तीन पक्षात होणारच, असा सवाल करत एका पक्षातही तिकीटासाठी वाद होत असल्याचे भुजबळ म्हणाले. तर पीएमआरडीए मेट्रो भरतीसंदर्भात भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राची भरती बिहारला होत असून महाराष्ट्राचे अभिमान असलेल्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी एक फोन केला तरी काम होईल. आंदोलनाची वाट कशाला पाहता आहात. त्यासाठी महाराष्ट्रातील भरती महाराष्ट्रात करा, असा सूचक सल्ला छगन  भुजबळ यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे. 


मला विचारुन मंत्रिमंडळ विस्तार होत नाही...  


तर संजय राऊत यांनी आज सकाळी जागावाटपा संदर्भात महत्वाचे वक्तव्ये केले. यावर भुजबळ म्हणाले की, अनेकदा अनेकांनी दावा केला असून त्याचपद्धतीने संजय राऊत यांनी दावा केला आहे. तर नंतर पटोले यांनी केला. मात्र या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्र असून चर्चा करणार आहेत. मग जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरु आहे. यावर भुजबळांनी मिश्कीलपणे उत्तर देत म्हटले की, मला विचारुन विस्तार होत नाही आणि थांबत नाही. काम चाललंय तर चालू द्या, मात्र त्यांचा हेतू मला माहिती असल्याचा सूचक इशारा यावेळी भुजबळांनी दिला. 


शरद पवार यांच्याबाबत ट्रकभर पुरावे, पण... 


तर नुकतेच अरविंद  केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ते भाजपविरुद्ध एकत्र येण्यासाठी बैठक घेत आहेत. यावर भुजबळ म्हणाले की, केंद्र राज्याच्या विरोधात काम करत असेल तर आवाज उठवला पाहिजे. अधिकाऱ्यांचे प्रस्थ असून त्यांचे अधिकार असले पाहिजे. त्यामुळे अरविंद केजरीवाल त्यासाठी आवाज उठवत आहेत. मात्र दुसरीकडे भारत सरकार नवा कायदा करण्याच्या तयारीत असून केंद्र सरकार लोकशाही विरोधी काम करत असल्याची टीका भुजबळ यांनी केली. भारत सरकार चालवण्यासाठी आम्ही एकत्र आलो. शिवसेना आणि आम्ही एकत्र आलोच ना? मागचा इतिहास विसरुन पुढे जायचं असतं. शरद पवार यांच्याबाबत ट्रकभर पुरावे सांगितले, एक पुरावा आणू शकले नाहीत.


भाजपमध्ये नेते स्वच्छ होतात.... 


तसेच नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केल्याचे दिसून आले. यावर भुजबळ म्हणाले की, गुजरातच्या पावडरमध्ये टाकले की स्वच्छ होतात. त्यांच्या पक्षात आले की स्वच्छ होतात. निवडणुकीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करतात तो पैसा कुठून येतो? असा सवाल केला. तर दुसरीकडे राज्यात कांदा, टोमॅटोचा दराचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. यावर मोदी यांच्यावर मदार असल्याचे सांगण्यात येत आहे. भुजबळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच परदेशातून आले आहेत, तसेच ते खूप पॉवरफुल असून त्यांनी एक फोन केला, तरी प्रश्न मिटेल, उपहासात्मक टोलाही यावेळी भुजबळांनी लगावला.