Nashik News : नाशिककरांसह (Nashik) पर्यटकांसाठी (Tourist) महत्वाची बातमी असून नाशिक शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल्सवर जेवणाला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाकडून नाशिक परिसरातील हॉटेल्सची (Hotels) तपासणी करण्यात आल्यानंतर अनेक हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित हॉटेल्सना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत.
आज अनेक नागरिक घरच्या जेवणासह आठवड्यातून एकदा तरी हॉटेल्सचे जेवण करण्याला पसंती देतात. शिवाय पावसाळ्यात (Rainy Season), वीकेण्डला यात गर्दी होऊन हॉटेल्स भरलेली असतात. कधी कधी बसायला सुद्धा जागा नसते. पण आपण जिथे पैसे मोजून खायला जातो, त्या ठिकाणी जर आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा होत असेल, तर वेळीच आपण अशा हॉटेल्सला जाणे टाळले पाहिजे, जेणेकरून आरोग्यास हानिकारक अन्न पदार्थापासून आपली सुटका होईल. याच पार्श्वभूमीवर नाशिक अन्न व औषध प्रशासनांकडून (FDA) हॉटेल्सची तपासणी मोहीम सुरु आहे. ही मोहीम सुरु असताना नाशिक शहरातील आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल्सची तपासणी करत असताना अनेक हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले आहे.
पावसाळ्याच्या दिवसात पर्यटन स्थळी तसेच शहरातील उपहारगृहांत होणारी गर्दीमुळे आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार उपहारगृहांची तपासणी सुरू केली आहे. उपहागृह व्यावसायिकांनी पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना दर्जेदार अन्न पदार्थ उपलब्ध होण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन सह आयुक्त (नाशिक विभाग) अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सं.भा. नारागुडे यांनी केले आहे. दरम्यान या मोहिमेत हॉटेल व्हेज ॲरोमा, गंगापुर रोड नाशिक, हॉटेल उडपी तडका, सोमेश्वर मंदिरासमोर, नाशिक, हॉटेल दिल से देसी, गंगापूर रोड, नाशिक, हॉटेल काका का ढाबा, जेहान सर्कल नाशिक, हॉटेल सयाजी, इंदिरानगर, नाशिक, हॉटेल कोटयार्ड बाय मेरीअट, मुंबई नाका, नाशिक, हॉटेल सियोना रेस्टॉरंट, गंगाव्हरे गाव, ता.जि.नाशिक, हॉटेल आरटीसन स्पिरिट प्रा.लि. गंगाव्हरे गाव, ता.जि.नाशिक या आठ उपहारगृहांची तपासणी करण्यात आली.
उपहारगृहांना नोटीस
दरम्यान तपासणीअंती बऱ्याच हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे परिशिष्ट 4 चे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यात प्रामुख्याने शीतपेटीत मुदतबाह्य अन्न पदार्थ साठवण केल्याचे आढळले. तसेच मासांहरी (चिकण) व दुग्धजन्य पदार्थ हे मुदतबाह्य झालेले असून साठविलेले आढळले आहे. स्वयंपाकगृहात अस्वच्छता आढळली. खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केलेली नसल्याचे तसेच त्यांना डोक्याला टोपी, हातमोजे व ॲपरॉन्स दिलेले आढळून आले नाही. स्वयंपाकघरात योग्य सुर्यप्रकाश तसेच योग्य रंग दिलेला नसल्याचे निदर्शनास आले. अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा विश्लेषण अहवाल ठेवलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा त्रूटी आढळून आलेल्या उपहारगृहांना सुधारणा करणेसंदर्भात नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. पुढील योग्य कारवाई कायद्यानुसार करण्यात येणार असल्याची माहिती सह आयुक्त नारागुडे यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :