Imtiaz Jaleel नाशिक : विधानसभा निवडणुकीआधी (Vidhan Sabha Election) राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीशिवायच्या (Mahavikas Aghadi) तिसऱ्या आघाडीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी नाशिकमध्ये (Nashik) मोठं वक्तव्य केले आहे. प्रस्थापित पक्ष आणि नेत्यांवरचा विश्वास आता लोकांचा कमी झाला आहे. तिसरी आघाडी निर्माण झाली तर राज्यात मोठी ताकद निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले आहे. 


इम्तियाज जलील म्हणाले की, तिसरी आघाडी तयार व्हायला हवी, अशी आमचीही इच्छा आहे. बच्चू कडूंच्या भूमिकेवर आम्हीही सकारात्मक आहोत. प्रस्थापित पक्ष आणि नेत्यांवरचा विश्वास आता लोकांचा कमी झाला आहे. इतर पक्षातील नेते आज एका पक्षामध्ये तर सकाळी उठल्यावर दुसऱ्या पक्षात दिसतात. तिसरी आघाडी निर्माण झाली तर राज्यात मोठी ताकद निर्माण होईल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.  


तिसरी आघाडी तयार करायची असेल तर...


ते पुढे म्हणाले की, मागच्या आठवड्यात आमचे राजू शेट्टी यांच्याशी बोलणे झाले आहे. लहान-लहान पक्ष एकत्र आले तर, एक नवी ताकद उभी राहू शकते. कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार झाला तर एकत्र येण्यास हरकत नाही. कोण किती जागा लढणार हे संपूर्ण चर्चा झाल्यानंतर ठरवू. तिसरी आघाडी तयार करायची असेल तर युती आणि आघाडीच्या विरोधात अजेंडा तयार करून लोकांच्या विश्वासास पात्र ठरवावे लागेल, असेही इम्तियाज जलील म्हणाले. 


सध्या राजकारणात जातीय तेढ निर्माण केलं जातंय


सरकारला शेतकऱ्यांशी काही देणंघेणं नाही. शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या आपल्या राज्यात झाल्या आहेत. सध्या देशात फुकट देण्याचं काम चालू आहे. शेतकऱ्यांना हमीभाव, नोकरदारांना नोकऱ्या देण्याची गरज आहे. लोकांना फुकटात काही नको. त्यांना आवश्यक गोष्टी दिल्या पाहिजेत. खूप छोटे-मोठ्या नेत्यांवर इतर पक्षाचे नेते बोलतील. पण तिसरी आघाडी तयार झाली तर आपण बघा आमच्यासोबत कोण कोण दिसतील. वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतील पण आमची विचारधारा देशसेवेची आहे. सध्या राजकारणात जातीय तेढ निर्माण केले जात आहे आणि त्यावर निवडणूक लढवल्या जात आहे.  सत्ताधारी बेरोजगारी, महागाई, शेतकरी या प्रश्नांवर कोणीही निवडणुका लढवणार नाही. इतरांकडून जातीच्या आधारावर निवडणूक लढवल्या जातील, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 


आणखी वाचा


Maharashtra Politics: इम्तियाज जलील यांच्या घरी अचानक लगबग वाढली; अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुर्राणी भेटीला, बंद दाराआड चर्चा