नाशिक : ओबीसीतून आरक्षण (OBC REservation) मागण्याचा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी हट्ट सोडल्यास त्यांचे आम्ही स्वागत करू. मात्र ते आपल्या हट्टावर कायम राहिल्यास त्यांना 13 ऑगस्ट रोजी नाशकात (Nashik) काळे झेंडे दाखवले जातील, असा इशारा ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके (Gaju Ghodke) यांनी एका निवेदनाद्वारे दिला. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप 13 ऑगस्टला नाशकात होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर गजू घोडके यांच्या या इशाऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सुरुवातीला मराठा आंदोलकांची मागणी होती. नंतर मात्र ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण मिळावे असा हट्ट मनोज जरांगे पाटील यांनी धरल्याने आरक्षणाच्या मुद्द्याला नाहक खतपाणी मिळाले आहे.ओबीसी समाजाला महाकष्टाने आरक्षण मिळाले आहे. त्यासाठी कित्येक वर्षे संघर्ष करावा लागला. परंतु ओबीसींच्या ताटातलेच आरक्षण आम्हाला हवे आणि त्यासाठी दमबाजी, मी याला पाडेल त्याला पाडेल अशा वल्गना करून सवंग प्रसिद्धी मिळवणे कितपत योग्य आहे. 


मनोज जरांगे पाटलांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे


प्रत्येकाचा एकेरी उल्लेख करणे, खालच्या पातळीवर उतरून बोलणे, पितृतुल्य व्यक्तींचा आदर न बाळगणे हे जरांगे पाटलांसारख्या मराठा नेत्याला निश्चितच शोभत नाही. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजास आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतरही सातत्याने आंदोलनाची नौटंकी करणे, सरकारला धमक्या देणे कितपत उचित आहे याचे आत्मपरीक्षण मनोज जरांगे पाटलांनी करणे गरजेचे आहे. 


...तर ओबीसींतर्फे काळे झेंडे दाखविले जातील


केवळ विशाल मोर्चे काढून आणि दमबाजीचे राजकारण करून आरक्षण मिळत नसते. त्यासाठी कायदेशीर लढाईच आवश्यक असते. ओबीसीतूनच मराठा समाजास आरक्षण देण्याची मागणी खऱ्या ओबीसींवर अन्याय करणारी असल्याने आम्ही ओबीसी बांधव त्याच्या सातत्याने निषेध करीत राहू. ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण मिळावे हा हट्ट त्यांनी सोडल्यास 13 ऑगस्टला त्यांचे नाशकात स्वागतच केले जाईल. मात्र आपल्या हट्टाला ते चिटकून राहिल्यास त्यांना ओबीसींतर्फे काळे झेंडे दाखविले जातील.तसेच त्यादिवशी प्रत्येक ओबीसी बांधव आपल्या घरावर काळी गुढी उभारेल,  असा इशाराही गजू घोडके यांनी निवेदनात दिला आहे.


आणखी वाचा 


फडणवीसांचं राजकीय करिअर संपलंय, आता तू माझ्या नादी लागू नको; मनोज जरांगेंनी भाजपच्या नेत्याला झोडपलं