छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्राची राजकीय प्रयोगशाळा असा लौकिक असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुरु असल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणामुळे छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhaji Nagar) मराठवाड्याच्या पट्ट्यात नवनवीन राजकीय समीकरणे आकाराला येताना दिसत आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी रात्री एक अनपेक्षित गोष्ट घडली. एमआयएम पक्षाचे माजी खासदार आणि महाराष्ट्र  प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या घरी मंगळवारी अचानक लगबग वाढली होती. अनेक राजकीय नेत्यांनी अचानकपणे त्यांची भेट घेतली. या अनपेक्षित भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


अब्दुल सत्तार, राजू शेट्टी (Raju Shetty), बाबाजानी दुर्राणी या तिघांनी नुकतीच इम्तियाज जलील यांची भेट घेतली.  आजपर्यंत अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज जलील यांची भेट घेणे टाळले होते. परंतु, अब्दुल सत्तार नेमके आताच जलील यांच्या भेटीला का गेले असावेत, या प्रश्नामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही. विशेष म्हणजे नुकताच शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) आणि जलील यांच्यातही बंद दाराआड चर्चा झाली. त्यांच्या या भेटीचे आणि चर्चेचे नेमके प्रयोजन काय होते, याचा तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही. बाबाजानी दुर्राणी यांची शरद पवार गटातील घरवापसी चर्चेचा विषय ठरली होती. शरद पवार साहेबांना सोडून गेलेले अनेक पाहिले, ते पुन्हा विधानभवनात दिसले नाहीत. ते शून्य झाले, बरं झालो मी शून्य होण्याआधी परत आलो, असे वक्तव्य यांनी शरद पवार गटात प्रवेश करताना केले होते.


मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राजू शेट्टी जलील यांच्या भेटीला


राजू शेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनांची मोट बांधून 288 जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. यादृष्टीने त्यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. यानंतर राजू शेट्टी थेट इम्तियाज जलील यांच्या भेटीला पोहोचल्याने अनेकजण बुचकाळ्यात पडले. यामागे कोणती राजकीय समीकरणे असावती, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता या भेटीगाठींमुळे आगामी काळात छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, हे पाहावे लागेल. 


आणखी वाचा


हिंदुत्ववादी संघटनांना मी तिथे नकोय, कोल्हापूर तुमच्या बापाची जहागीर नाही : इम्तियाज जलील