नाशिक : गिरणा नदी (Girna River) पात्रात रविवारी मासेमारी करण्यासाठी गेलेले 15 तरुण पाणी पातळी वाढल्याने अडकून पडले होते. रविवारपासून त्यांच्या बचावासाठी रेस्क्यू ऑपरेशन (Girna River Rescue) सुरु होते. अखेर तब्बल 15 तासांनंतर तरुणांची लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या (Helicopter) माध्यमातून सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर तरुणांनी संपूर्ण घटनेचा थरार एबीपी माझाशी बोलताना सांगितला आहे.

  


नाशिकच्या मालेगावातील सवंदगाव शिवारातील गिरणा नदीपात्रात अडकलेल्या १५ मासेमारांना रेस्क्यू  करण्यात प्रशासनाला यश आले आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करत तीन फेऱ्यांमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 15 मासेमारांना यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले. 


सुटका झाल्यानंतर काय म्हणाले तरुण? 


यावेळी तरुण म्हणाले की, रात्री पाऊस नव्हता मात्र अचानक पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे आम्ही रात्रभर तिथे बसून होतो. पाणी वाढत असल्याने थोडी भीती वाटत होती. आम्ही मासेमारी करायला गेलो असता दहा मिनिटात पाणी वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे आम्ही त्या खडकावर अडकून पडलो. आम्ही या परिसरात दररोज येत नाही. आम्ही महिन्यातून एक ते दोन वेळेस या ठिकाणी मासेमारीसाठी येतो, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, पाणी पातळी जास्त असल्याने रेस्क्यू करण्यात अडचणी येत होत्या. काल प्रयत्न करण्यात आले. मात्र, अंधारामुळे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले होते. आज सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन राबवून तरुणांची सुखरूप सुटका करण्यात आली. रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतर प्रशासनाकडून तरुणांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. 


पाण्याची पातळी वाढल्याने खडकावर अडकले


दरम्यान, काल सायंकाळी मालेगाव, धुळे येथील 15 मासेमार हे मासेमारी करण्यासाठी सवंदगाव शिवारातील नदीपात्रात उतरले होते. कळवण, दिंडोरी या भागातील चणकापुर व हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सोडण्यात आला होता हे पाणी वाढल्याने 15 मासेमार नदीपात्रातील एका खडकावर अडकले होते. स्थानिक अग्निशमन दलाच्या वतीने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांना यश न आल्याने एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांच्याकडून देखील काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे मासेमारांना वाचविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. 



15 मासेमारांची सुखरूप सुटका


आज सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क करून वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य करण्याचे ठरले. अखेर आज सकाळी 12 वाजेच्या सुमारास वायुसेनेच्या हेलिकॉप्टर दाखल होवून तीन फेऱ्या पूर्ण करत अडकलेल्या 15 मासेमारांना रेस्क्यू करण्यात आले. मंत्री दादा भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आदींसह अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, प्रांताधिकारी नितीन सदगिर आदी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन नंतर समाधान व्यक्त केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.


आणखी वाचा 


Nashik Rain : हृदयद्रावक... रामकुंडात तरणाबांड पोरगा गेला, आईने टाहो फोडला; सुदैवाने बचावली तीन वर्षांची चिमुकली