Bhagyashree Banayat IAS: नाशिक मनपा अतिरिक्त आयुक्तपदी  भाग्यश्री बानायत-धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  भाग्यश्री बानायत धिवरे या शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी होत्या. नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


दरम्यान तत्कालीन मनपा अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम हे मे 2022 मध्ये नाशिकमध्ये आले होते. तत्पूर्वी ते मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे मागील महिन्यातच त्यांच्या ठेकेदारासोबत गुप्त वाटाघाटीमुळे ते चर्चेत आले होते. नाशिक मनपाच्या वादग्रस्त पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याची निविदाप्रक्रिया सुरू असतानाच सुटीच्या दिवशी विश्रामगृहावर ठेकेदारासोबतच्या गुप्त बैठक चर्चेत आली होती. यावर मनपा  आयुक्तांनी अशोक आत्राम यांना नोटीस बजावली होती. त्यावेळीच त्यांच्या बदलीची चर्चा रंगू लागली होती. तर अशोक आत्राम यांच्या बदलीनंतर आता भाग्यश्री बानायत अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी हाती घेणार आहेत. तर भाग्यश्री बानायत यांनी शिर्डी साई मंदिर संस्थांनच्या सीईओ पदी 2021 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. तर काही महिन्यांपूर्वी त्यांच्या काजकाजावर स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे बानायत यांची शिर्डी संस्थानातून बदली करण्यात येऊन त्यांना विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्त केले होते. 


मात्र आठवडाभरातच त्यांना नागपूर ऐवजी नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली होती. दरम्यान अतिरिक्त विभागीय आयुक्त पदी बदली देखील रद्द करून आता पुन्हा नाशिक मनपा अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 


कोण आहेत भाग्यश्री बानायत..?
भाग्यश्री बानायत शालेय शिक्षण अमरावती जिल्ह्यातील हिवरखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. तर मोर्शी येथील महाविद्यालयातुन त्या बीएस्सी झाल्या.  बीएस्सीनंतर त्यांनी बीएड केले. पुढे एक वर्ष एमएससी केलं. अमरावती महानगरपालिकेत त्यांना विषयतज्ञ म्हणून काम मिळालं. प्रथम 2005 साली प्रकल्प अधिकारी, 2006 साली तहसीलदार, 2007 साली सहाय्यक आयुक्त, विक्रीकर विभाग अशा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत त्यांच्या सलग निवडी होत गेल्या. 2012 साली त्यांची भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.