Hemant Godse : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे आज मोठे शक्तीप्रदर्शन करत ठाण्यात (Thane) दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाशिकची जागा शिवसेनेचीच (Shiv Sena), धनुष्यबाण रामाचा, हेमंत आप्पा कामाचा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 


नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत पेच कायम आहे. काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या घोषणेमुळे भाजपमध्ये नाराजी पसरल्याचे दिसून आले. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. नाशिकच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही आहे.  


गोडसेंच्या कार्यकर्त्यांकडून ठाण्यात जोरदार घोषणाबाजी 


आता खासदार हेमंत गोडसे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाण्यात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी नाशिकचे शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. नाशिक लोकसभाची जागा शिवसेनेलाच मिळावी, हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ठाण्यात हेमंत गोडसेंचा ताफा पोहोचताच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 


शिवसैनिक धडकले मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी


गेल्या काही दिवसांपासून भाजप पदाधिकारी नाशिकची जागा भाजपा लाच मिळणार असल्याचा दावा करत असल्याने शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता असल्याचे दिसून आले आहे. त्याच अस्वस्थतेतून शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी धडकले आहेत. आता महायुती (Mahayuti Seat Sharing) नाशिकच्या जागेबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांचा ठिय्या


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या बाहेर मंत्री दादा भुसे, विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि सुहास कांदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत ठिय्या मांडण्यात आला आहे. जागेचा तोडगा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत या ठिकाणी बसून राहण्याचा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे. 


गोडसे विजयी हॅटट्रिक करणार ? 


हेमंत गोडसे हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. ते नाशिकचे विद्यमान खासदार आहेत. हेमंत गोडसे यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत  'मनसे'तर्फे प्रथमच खासदारकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करवा लागला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून 2014 सालच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव केला. 2014 साली हेमंत गोडसे हे पहिल्यांदा नाशिकचे खासदार बनले होते. त्यानंतर 2019 साली हेमंत गोडसे यांनी समीर भुजबळ यांचा पराभव करत ते दुसऱ्यांदा नाशिकचे खासदार बनले. आता हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभेतून विजयी हॅटट्रिक करण्याच्या तयारीत असून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


आणखी वाचा 


जानकरांच्या महायुतीत जाण्याने डाव उलटला, पण शरद पवार आता माढात शेवटचा पत्ता टाकणार?