नाशिक : मी महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच आहे, माझी छाती फाडली तरी त्यात शरद पवार दिसतील असं वक्तव्य गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) यांनी केलंय. शरद पवारांनी जर संधी दिली तर मी वडिलांविरोधात लढण्यास तयार आहे अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली. गोकुळ झिरवाळ हे अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे पुत्र आहेत. गोकुळ झिरवाळ यांनी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या नाशिकच्या मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.  


गोकुळ झिरवाळ म्हणाले की, माझ्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांकडे बघून झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मी पहिल्यापासून काम करतोय. मी लोकसभा निवडणूक देखील लढण्यास इच्छुक होतो. मी महाविकास आघाडीतच आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच आहे. माझी छाती पडली तरी शरद पवार दिसतील. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मी पहिल्यापासून काम करतोय.


पवारांनी आदेश दिला तर वडिलांच्या विरोधात लढणार


कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं असं सांगत गोकुळ झिरवाळ म्हणाले की,  विधानसभेची निवडणूक लढण्यास मी इच्छुक आहे.  नरहरी झिरवाळांच्या विरोधात लढण्याचीदेखील माझी इच्छा आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर मी लढण्यास तयार आहे. 


नाशिकमधील जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला नरहरी झिरवाळ यांच्या पुत्राने उपस्थिती लावल्याने चर्चांना उधाण आलंय. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात नरहळी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी उपस्थिती लावली. गोकुळ झिरवाळ हे दिंडोरी  विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नरहरी झिरवाळ काही निर्णय घेतात का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.


दिंडोरीतून निवडणूक लढवणार?


नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत गोकुळ झिरवाळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झिरवाळ काही वेगळा निर्णय घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


ही बातमी वाचा: