Nashik Suhas Kande : ज्यावेळी मनमाड-करंजवण योजना (Manmad Karanjvan Scheme) करण्याचे ठरवले, सर्व पाठपुरावा केला, मात्र ज्यावेळी मान्यता मिळवण्याचा विषय आला. तेव्हा माजी मुख्यमंत्र्यांकडे 25 वेळा चकरा मारल्या, पण काम झालं नाही, शेवटी राज्यात सत्ता बदलली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना योजेनेबद्दल सांगितले आणि त्यांनी एका क्षणात या योजनेला मंजुरी देऊन ते देवासारखे धावून आल्याचे मत आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी व्यक्त केले.
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्याच्या (CM Eknath Shinde) हस्ते पार पडला. यावेळी आमदार सुहास कांदे हे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मनमाड करंजवण योजना गेल्या सत्तर वर्षापासून जैसे थे होती, मनमाड शहर परिसरात पाण्याचा स्रोत नाही. पाणी उपल्बध नसल्याने उन्हाळभर महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. मात्र जेव्हा आमदार झालो, पहिल्यांदा या योजनेचा पाठपुरवठा सुरु केला. गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड पाणी बचाव कृती समिती, सगळ्यांचे प्रयत्न यासाठी लागले. सुरुवातीला कोर्टात जावे लागले. यानंतर बैठका सुरु झाल्या. मात्र शेवटी या योजनेसाठी 15 टक्के स्वनिधी हवा होता. त्यात मनमाड नगरपालिका ब वर्गात असल्याने ते शक्य नव्हते.
शेवटी वैतागून एक दिवस पत्र फाडलं : सुहास कांदे
कांदे पुढे म्हणाले की, "स्वनिधी साठी माजी मुख्यमंत्र्याकडे 25 वेळा चकरा मारल्या. शेवटी वैतागून एक दिवस पत्र फाडलं, सगळं सोडून दिले. काही महिन्यांनंतर राज्यात शिंदे सरकार आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो, मनमाडची व्यथा मांडली. पाणी नसल्याने मनमाडवासियांचे हाल होत आहेत, स्थलांतर वाढलं आहे, व्यापारी वर्ग ढासळला आहे. अशी सर्व व्यथा ऐकल्यानंतर एकनाथ शिंदे हे देवासारखे भेटले. तातडीने त्यांनी योजनेला हिरवा कंदील दिला. स्वनिधीचे 15 टक्के देणार असे आश्वासन दिले, त्यामुळे हत्तीचे बळ आले. त्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळाली आणि आज या योजेनचे भूमिपूजन झाले.
तिकीट देऊ नका, मात्र...
आमदार कांदे म्हणाले की, "आमदारकीचं तिकीट नका देऊ, मात्र ही योजना पूर्ण करा, सव्वा लाख मनमाड करांची इच्छा पूर्ण करा. या लोकांचे देणं लागतो आहे, त्यामुळे तुमच्याकडे मागतो आहे, एकही रुपया कमी पडणार नाही, अशी ग्वाही द्या. 78 योजना खेडी देखील लवकरच पूर्ण होणार आहे. या योजनेचे सात ते आठ किलोमीटरचे काम पूर्ण होत आले आहे. पाचशे कोटीच्या योजना आतापर्यंत मनमाड शहरात आल्या आहेत. ही योजना गुरुत्वाकर्षणाने येणार आहे. त्यामुळे एक रुपयांचं लाईट बिल लागणार नाही. 25 वर्षाचे धोरण देऊन ही योजना या राबविण्यात येत आहेत."