नाशिक : नाशिक मनपाकडून (Nashik NMC) 2002 साली अधिग्रहित केलेल्या जागेचा अद्याप मोबदला न मिळाल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांनी (Farmers) आक्रमक भूमिका घेतली आहे. जागेच मोबदला तात्काळ न मिळाल्यास तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर नांगर फिरवू असा इशाराही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नाशिक महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या वतीने 2002 साली तपोवन परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी महापालिकेने अधिग्रहित केल्या होत्या. तेव्हापासून शेतकऱ्यांना या जागेचा मोबदला न मिळाल्याने स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे (Uddhav Nimse) यांनी तीन आठवड्यापूर्वी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचा मोबदला तातडीने द्यावा यासाठी उद्धव निमसे आग्रही आहेत. या आंदोलनावेळी आयुक्त नसल्याने उद्धव निमसे यांनी आज पुन्हा शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळाला सोबत घेऊन महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर (Ashok Karanjkar) यांची भेट घेतली.
मर्जीतील बिल्डरांनाच भूसंपादनाचा मोबदला मिळाल्याचा आरोप
शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला मिळाला नसून महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतील बिल्डरांनाच भूसंपादनाचा मोबदला मिळत असल्याचा आरोप उद्धव निमसे यांनी केला आहे. या भूसंपादन प्रकरणी संबंधित विभागाची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तोडगा काढू, असे आश्वासन आयुक्त अशोक करंजकर यांनी दिले आहे.
शेतकऱ्यांना मोबदला देऊ
पुन्हा एकदा खाजगी बिल्डरांना लक्ष करत 30 टक्के रक्कम दिल्याशिवाय महापालिकेतील अधिकारी भूसंपादनाचा मोबदला देत नसल्याचा पुनरुच्चार उद्धव निमसे यांनी केला असून आगामी काळात सर्वच रिंग रोड खोदून काढू, असा इशाराही उद्धव निमसे यांनी दिला आहे. तर मनपा आयुक्तांची भेट घेऊन आमचे समाधान झाले नाही. शहरातील बांधकाम व्यवसायिकांना शेकडो कोटींची वाटप झाले आहे. शिष्टमंडळाला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, अशी प्रतिक्रिया शेतकर्यांनी दिली आहे. तर संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन शेतकऱ्यांना मोबदला देऊ. कोणालाही खाजगी चेक दिले नाही, अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.
उद्धव निमसेंचा महायुती सरकारला घरचा आहेर
दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाकडून भूसंपादनात काही बांधकाम व्यावसायिकांचे भले होत असून शेतकऱ्यांचे भूसंपादन नियमानुसार होत नसल्याचा आरोप करत भाजपचे माजी स्थायी सभापती उद्धव निमसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महापालिकेत धडक देत आयुक्तांच्या दालनाबाहेर काही दिवसांपूर्वी ठिय्या आंदोलन केले होते. महानगरपालिकेत 30 टक्के लाच घेतल्याशिवाय कामे होत नाहीत, असा आरोप करत भाजपचे तीन आमदार आणि पालकमंत्री दादा भुसे मौन बाळगून असल्याचा आरोप करत निमसे यांनी सत्ताधारी महायुतीला घरचा आहेर दिला होता.
आणखी वाचा