Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपने डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamare) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीकडून सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र अब्दुल रहमान (Abdul Rehman) यांचा उमेदवारी अर्ज छाननीअंती बाद ठरवण्यात आला आहे. 


धुळे लोकसभा मतदारसंघात (Dhule Lok Sabha Constituency) अडीच लाखाहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. या मतदारांचा फायदा उचलण्यासाठी एमआयएमकडून धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात देण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीने अब्दुल रहमान यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे धुळ्याची राजकीय समीकरणे बदलणार होती. अब्दुल रहमान यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होणार असे बोलले जात होते. मात्र आता धुळ्यातून वंचितला मोठा धक्का बसला आहे. 


अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद 


धुळे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननीअंती बाद झाला आहे. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा न्यायप्रविष्ठ निर्णय पूर्ण न झाल्याने निवडणूक आयोगाने अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद केला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात (High Court) जाणार असल्याची अब्दुल रहमान यांनी माहिती दिली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता हायकोर्ट याबाबत काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


कोण आहेत अब्दुल रेहमान?


अब्दुल रहमान यांनी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. ते पोलीस महानिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी आपण राजकारणात येत आहोत, हा आपला मुख्य अजेंडा असल्याचे सांगत त्यांनी राजकारणात प्रवेश केलाय. मात्र आता त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Dhule Lok Sabha : माजी आमदार अनिल गोटेंचा शोभा बच्छावांना पाठिंबा की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी 'लिटमस टेस्ट'? धुळ्यात रंगली जोरदार चर्चा


Dhule Lok Sabha : सुभाष भामरे लाखोंच्या लीडने विजयी होणार, गिरीश महाजनांना विश्वास, धुळ्यात महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन