Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamare) यांनी आपला उमेदवारी अर्ज (Nomination Form) दाखल करण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन करीत भव्य रॅली काढली. या रॅलीत महायुतीतील सर्वच पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉ. सुभाष भामरे यांच्या महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्यशक्ती प्रदर्शन करीत रॅली काढली. शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी तसेच महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच धुळेकर नागरिक हजारोंच्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.
सुभाष भामरे लाखोंच्या लीडने विजयी होणार : गिरीश महाजन
सजवलेल्या भव्य रथावर डॉक्टर सुभाष भामरे, गिरीश महाजन (Girish Mahajan) धुळेकर जनतेला अभिवादन करीत या रॅलीतून मार्गस्थ झाले. या रॅलीत ढोल पथकासह आदिवासी बांधव नृत्य करीत सहभागी झाले होते. धुळेकर जनतेने आणि संपूर्ण देशाने नरेंद्र मोदींना इतरांना पंतप्रधान करण्याचा निश्चय केला असून सुभाष भामरे हे तिसऱ्यांदा लाखोंच्या लीडने विजयी होतील, असा विश्वास गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.
विरोधकांकडे फक्त नेतेच उरलेत, कार्यकर्ते नाहीत - गिरीश महाजन
विरोधकांकडे फक्त नेते उरले आहेत. मात्र कार्यकर्ते आणि मतदार कुठे आहेत? असा प्रश्न विचारत गिरीश महाजन यांनी विरोधकांवर टीका केली. अभिजीत पाटील यांच्या भाजपा प्रदेशावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, अभिजीत पाटील यांच्या सोबतच महाराष्ट्रातील विविध भागातील अनेक जण भाजपात येण्यास तयार आहेत. सर्वांनाच मुख्य प्रवाहात यायचे असून नरेंद्र मोदी यांच्यासोबत देश विकासाच्या कार्यात त्यांना सहभागी व्हायचे आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केली.
धुळ्यात तिरंगी लढत
धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre), महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) आणि वंचित बहुजन आघाडीकडून अब्दुल रहमान (Abdul Rehman) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
आणखी वाचा