नाशिक : मालवणची घटना दुर्दैवी आहे. विरोधकांनी अनेक विषयावर राजकारण करावे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) राजकीय विषय नाही. ते आमचे श्रद्धास्थान आहे. विरोधकांनी राजकारण करू नये, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. नांदगाव (Nandgaon) येथे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा (Shivsrushti) लोकार्पण सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नांदगावकर जनतेचे एवढे प्रेम मिळाले. सुहास आण्णाचा कार्यक्रम भारी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवसृष्टीच्या उद्घाटनाच्या शुभेच्छा. शिवछत्रपती म्हणजे धैर्य, समर्पण, त्याग आहे. शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष, युग प्रवर्तक, रयतेचा राजा, आदर्श राजा आहे. ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होत आहोत. आपण भाग्यवान आहोत की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण जन्म घेतला. एकनाथ शिंदे दोन्ही हाताने देणारा आहे, घेणारा नाही. नांदगावला यापुढे देखील मोठा निधी उपलब्ध करून देणार आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
...तेव्हा सुहास कांदे सर्वात पुढे होते
ते पुढे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी आपण इतिहास घडविला. जे आमदार माझ्याकडे आले ते माझे आमदार कधी खाली हात गेले नाही. सुहास कांदे यांना कायम मदत देत राहणार आहे. एक शब्द मी सांगितला, आपल्याला हे करायचे आहे तेव्हा सुहास कांदे सर्वात पुढे होते, असे आमदार भेटले हे माझे नशीब आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सुहास कांदे यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला
माझ्यावर विश्वास टाकला म्हणून दोन वर्षे आपण कारभार करत आहोत. शेतकरी, महिला, विद्यार्थी, गरीब, कष्टकरी या सर्वांसाठी आपण काम केले, सगळ्याच घटकांचा विकास सुरू आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढी माझी जबाबदारी नाही. माझे कुटुंब माझे महाराष्ट्र ही माझी जबाबदारी आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला.
बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी
लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधकांनी सांगितले ही फसवी योजना आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आणि पैसे खात्यावर पोहोचले. त्यामुळे विरोधकांचे चेहरे पडले आहेत. हे हप्ते घेणारे नाही, हे सरकार बहिणींच्या खात्यात पैसे टाकणारे आहे. भविष्यात दीड हजारांवर थांबणार नाही. दीड हजारांचे, दोन, तीन अजूनही पैसे वाढत राहतील. बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. लाडक्या बहिणीनंतर लाडका भाऊ योजना देखील आणली. प्रशिक्षण देताना मानधन देणारे हे पहिलेच सरकार आहे. सोन्याचे चमचे घेऊन आलेल्यांना पंधराशे रुपयांची किंमत काय कळणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
छत्रपती शिवाजी महाराज आमचे श्रद्धास्थान
मालवणची घटना दुर्दैवी आहे. विरोधकांनी याचे राजकारण केले हे दुर्दैवी आहे. घटनेतील दोषींना शिक्षा होईल, कोणालाही सोडणार नाही. नौदल व राज्य सरकार मिळून पुन्हा भव्य दिव्य पुतळा उभारणार आहे. विरोधकांनी अनेक विषयावर राजकारण करावे. छत्रपती शिवाजी महाराज राजकीय विषय नाही. ते आमचे श्रद्धास्थान आहे. विरोधकांनी राजकारण करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा
शिवाजी महाराजांची माफी मागताना नरेंद्र मोदी काय म्हणाले? मोदींच्या भाषणातील A टू Z मु्द्दे