Crime News नाशिक : शिरपूर पोलीस (Shirpur Police ) दलाने अंमली पदार्थच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. शिरपूर (Shirpur) तालुक्यातील लाकड्या हनुमान गावाच्या परिसरात तब्बल 3 एकर क्षेत्रावर गांजाची (Ganja) शेती उखडून फेकण्यात धुळे एलसीबी आणि सांगवी पोलिसांना यश आले आहे. प्राथमिक माहिती नुसार पकडलेल्या ओल्या आणि सुक्या गांजाची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. अलीकडे जिल्ह्यात होणाऱ्या अंमली पदार्थच्या (Crime News) विरोधातील मोठ्या कारवाईचे प्रमाण लक्षात घेता धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे देखील या कारवाईस्थळी पोहोचले होते.
बाजरी, ज्वारी पिकाच्याआड गांजाची लागवड
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेकलीयापाणी धरणाच्या वाहत्या पाण्यालगत आणि अन्य तीन ठिकाणी गांजाची शेती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगवी पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकला. यावेळी बाजरी, ज्वारी पिकाच्याआड गांजाची लागवड आढळून आली. सुमारे 2 ते 3 एकर क्षेत्रात 5 ते 7 फुट उंचीचे गांजाची झाडे आढळलीत. शिवाय, एका झोपडीतूनही सुकवलेला 100 ते 120 किलो वजनाचा कोरडा गांजा देखील यावेळी मिळून आला. काही महिन्यांपूर्वी याच परिसरात आंतरपीक म्हणून गांजाची (Ganja) शेतीवर स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखा आणि शिरपूर तालुका पोलीस पथकाने छापा टाकून तब्बल 721 किलो 400 ग्रॅम वजनाचा तीन कोटी दहा हजार रूपये किंमतीचा ओला गांजा जप्त केला होता. त्यावेळी ही कारवाई आजपर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे दिसून आले होते. मात्र, आता याच परिसरात केलेल्या या कारवाईमुळे शेतात गांजा पिकवण्याचे शेतकऱ्यांचे पुन्हा धाडस झाल्याचे दिसून आले आहे.
चक्क वनविभागाच्या जमिनीवरच गांजाची शेती
घटनास्थळी दोन तीन एकरावर उघडपणे गांजाची शेती केली जाते. विशेष म्हणजे वनविभागाच्या जमिनीवरच ही शेती फुलवली जात आहे. आपल्या हद्दीत, आपल्याच जमिनीवर मोठ्या प्रमाणात कोट्यावधींच्या गांजाची शेती होत असताना, वनविभाग नेमके काय करत होते? असा प्रश्न पोलिसांच्या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. वनविभागाने वेळोवेळी गस्त घालुन आपल्या भागात अवैध काही होत असेल तर ते रोखण्याची आणि त्याची माहिती पोलीस यंत्रणेला देणे वनविभागाला बंधनकारक आहे. मात्र वनविभागाने तसे काही केले नाही. त्यामुळे पोलीस विभागातर्फे सर्व संबंधित वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा गंभीर कसुरी अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.
पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यानंतर मुद्देमालाची मोजणी युद्ध पातळीवर सुरू झाली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय दत्तात्रय शिंदे, पीआय श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती देखील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.