Dada Bhuse : शनिवारी राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. तर नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे देण्यात आले आहे. नाशिकमधून पालकमंत्रीपदासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसे (Dada Bhuse) इच्छुक होते. आता नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट झाल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दादा भुसे म्हणाले की, असं काही नसतं, डावलणे वैगरे अशातला काही भाग नाही. जी जबाबदारी दिली ती पुढे नेणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे काम असते. मला या ठिकाणी जी काही जबाबदारी दिली ती आम्ही पुढे नेऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संवाद साधून निर्णय केले आहेत. ते निर्णय पुढे नेणे हे कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.
आता 'तो' उल्लेख हॉल तिकिटावर राहणार नाही
दहावी-बारावीच्या परीक्षेसाठीच्या हॉल तिकीटांवर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला होता. 12 वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिटचे वाटपही करण्यात आले. पण, टीकेनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलगिरी व्यक्त करत हा निर्णय रद्द केला. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला ही वस्तुस्थिती आहे. विभागाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. त्या पाठीमागचा उद्देश असा होता, की त्या विद्यार्थ्यांना भविष्यकाळातील काही योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून तो कॉलम टाकण्यात आला होता. परंतु तो आता पाठीमागे घेण्यात आला आहे. यानंतर तो उल्लेख हॉल तिकिटावर राहणार नाही, असे त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या