मुंबई : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teachers Constituency) निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून निवडणुकीसाठी (Election 2024) 26 जून रोजी मतदान आणि 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. काल (दि.31) भाजप नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसचे नेते आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांनीही नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहे. 


काँग्रेसचे नेते संदीप गुळवे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत (Shiv Sena UBT) पक्ष प्रवेश केला. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. दोन्ही पक्षाच्या सहमतीतून संदीप गुळवे यांचा पक्षप्रवेश ठाकरे गटात झाला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या उपस्थितीत गुळवेंचा पक्षप्रवेश झाला. 


नाशिक जागा जिंकून आणणार : संदीप गुळवे


पक्षप्रवेशानंतर संदीप गुळवे म्हणाले की, माझा आज प्रवेश करून घेतला त्याबद्दल धन्यवाद देतो. आज माझा प्रवेश करून शिक्षकांची सेवा करण्याची संधी दिली आहे, माझी उमेदवारी केली आहे. हा विश्वास मी सार्थ ठरवेल.  नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा मी जिंकून आणून आणेल. ही संधी मला दिली त्याबद्दल मी आभार मानतो, असे त्यांनी म्हटले.  


किशोर दराडे यांचे आव्हान वाटत नाही : संदीप गुळवे


मी तयारी काँग्रेस पक्षातून केली होती. मात्र बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि संजय राऊत यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सांगितले की ही जागा शिवसेनेला सुटली तरी सुद्धा आमचे उमेदवार हे संदीप गुळवे असतील.  त्यानुसार शिवसेनेला नाशिक  शिक्षक मतदार संघाची जागा सुटली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करूनच मी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. किशोर दराडे यांचे मला आव्हान वाटत नाही. कारण सहा वर्षात त्यांचे कामकाज बघितलं तर नकारत्मक वातावरण संपूर्ण मतदारसंघात आहे.  त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी 100 टक्के विजयी होईल, असेही त्यांनी म्हटले. 


सुधाकर बडगुजरांचा किशोर दराडेंना टोला


यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर म्हणाले की,संदीप गुळवे हे एक उभरते नेतृत्व आहे.  किशोर दराडे ज्यांना मागच्यावेळी आपण निवडून दिले ते आता आपल्यात दिसत नाही. ते आता पाठिंबा मागत फिरत आहे, असा टोला त्यांनी यावेळी नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांना लगावला. हा मतदार संघ आपण जिंकू हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे, असे त्यांनी म्हटले. 


उद्धव ठाकरेंच्या आदेशाने गुळवेंचा प्रवेश : संजय राऊत


संजय राऊत म्हणाले की, संदीप गुळवे आणि शिक्षक बंधू यांचा स्वागत करतो. आज संध्याकाळनंतर एक्झिट पोल प्रकार समोर येईल.  पंतप्रधान ध्यान करत आहेत. आताच त्यांनी डोळे बंद केले आहेत. त्यांना आजचा हा शिवसेनेचा कार्यक्रम दिसत असेल. नाशिक शिक्षक मतदारसंघात आपण संदीप गुळवे यांना उमेदवारी देऊन महाविकास आघाडी म्हणून ही लागा लढवत आहोत.  मागच्या वेळी आपण शिवसेनेचा उमेदवार निवडून आणला होता. संपूर्ण शिवसेनेची यंत्रणा काम करत होती आणि त्यानंतर किशोर दराडे जिंकले. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा अधिकार आहे. शिवसेना या चार अक्षरात ताकद आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने आपण संदीप गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी देत आहोत. त्यांनी सांगितलं त्यांचा पक्ष प्रवेश करून घ्या. ते आपले उमेदवार असतील, असे त्यांनी म्हटले. 


कोण आहेत संदीप गुळवे? 


अ‍ॅड. संदिप गुळवे यांचे शिक्षण बी.ए., एल.एल.बी. पर्यंत झालेले असून नाशिक जिल्हा परिषदेचे 2012 ते 2017 पर्यंत ते सदस्य होते. महाराष्ट्रातील बलाढ्य शिक्षण संस्था म्हणून लौकिक असलेल्या मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ते संचालक आहेत. नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यातील विविध सहकारी, शिक्षण व कृषी संघटनांशी ते निगडीत आहेत. ते काँग्रेस पक्षात असून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 


आणखी वाचा


'बंडखोरी नाही, राजकीय जोडे बाजूला ठेवत शिक्षकांसाठी लढणार', नाशिक शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात