नाशिक: नाशिक पोलीस (Nashik Police) आयुक्तलयाच्या नेतृत्वात बदल करण्यात आले आहे. मावळ गोळीबार प्रकरणात चर्चेत आलेल्या संदीप कर्णिक यांच्याकडे नाशिकच्या कायदा सुव्यवस्थाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवनियुक्त आयुक्तांसमोर शहरातील गुन्हेगारी, एमडी ड्रग्ज रॅकेटचा नायनाट करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तर कोअर पोलीस atc सेल सक्षम करण्याकडे प्राधान्य देणार असल्याचा विश्वास कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी व्यक्त केला.
टोळक्याचा हैदोस... गाव गुंडाची दहशत.. गाड्याची तोडफोड.. हे सर्व कमी होते की काय म्हणून ड्रग्जचा विळखा शहरातील शाळा महाविद्यालयापर्यंत जाऊन पोहचला आहे. मुबंई पुणे पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन ड्रग्जचे रॅकेट उद्ध्वस्त केल्यानं नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. नागरिकांच्या पोलीस दलाविषयी तक्रारी लोकप्रतिनिधीची नाराजी, वाढू लागली. नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची अवघ्या 11 महिन्यात नाशिकहून बदली करण्यात आली. शिंदेंच्या काळात पोलिसांच्या झालेल्या बदल्या, खंडणी, अंमली पदार्थ विरोधी पथक, क्राईम ब्रान्चला दिलेलं बळ याचा सकारात्मक परिणाम पोलीस दलावर दिसून आला. नाशिक पोलिसांनी सोलापूरमध्ये जाऊन ड्रग्जचा उद्ध्वस्त केलेला कारखाना, ड्रग्ज माफियांवर लावलेला मोक्का या उल्लेखनीय कारवाई होत्या. मात्र त्या आधीच त्याच्या बदलीवर वरिष्ठांचे एकमत झाले होते. अखेर आज त्यांना नाशिकचा पोलीस आयुक्त पदाचा पदभार सोडवा लागला.
राज्य सरकारचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर अंकुश शिंदे चर्चेत आले आणि त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर सध्या पुणे पोलीस दलात सहआयुक्त पदाची जबाबदारी सांभाळणारे आणि मावळ गोळीबार प्रकरणात चर्चेत आलेल्या संदीप कर्णिक यांच्यावर नाशिकच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पदभार स्वीकारताना त्यांनी नाशिकमधे कोअर पोलिसिंग करणायचे ATC सेल अधिक सतर्क करणे, गावगुंडची दहशत कमी करण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे जाहीर केले. पुण्याहून बदली झाल्यानं ललित पाटील ड्रग्स प्रकरणची नाशिक पुणे लिंक असल्याने ते सोडविताना ही कर्णिक यांना सोपे जाणार आहे.
नाशिकच्या ग्रामदेवता असणाऱ्या कालिका मातेचं दर्शन घेतल्यानंतर कर्णिक यांनी पदभार स्वीकारला आहे.
अंकुश शिंदें यांच्याआधी असणाऱ्या पोलिस आयुक्ताचाही कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाली होती.नाशिकचा वाढता विकास, विस्ताराबरोबर गुन्हेगारी ही वाढत असल्याने नव्या दमाच्या पोलीस आयुक्तां समोर अनेक आव्हान आहेत, त्यावर कशी मात करतात शहरातील गुन्हेगारी कशी आटोक्यात आणणार हे बघणे महत्वाचे आहे.