नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नाशिक दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरगाणा (Surgana) येथे 736 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) पाच लाभार्थी महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांच्या कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात (Kalwan-Surgana Vidhan Sabha Constituency) हा कार्यक्रम पार पडला. आदिवासी बांधवांकडून पारंपरिक पद्धतीने आदिवासी नृत्य सादर करत अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींना गिफ्ट दिले आहे.
पाच महिला लाभार्थींचा सन्मान
यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. राज्यातील तब्बल 2 कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरु शकतात. या योजनेअंतर्गत औपचारिकरीत्या पाच महिलांचा सन्मान अजितदादांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
रक्षाबंधनापूर्वी 1 कोटी महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ
यावेळी मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) म्हणाल्या की, नितीन पवारांच्या मतदार संघात दादांचं सर्वात जास्त वेळेस दौरा झाला आहे. शेतकरी, महिला आणि युवकांच्या विकास कामाला दादांनी सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. 21 ते 65 वयोगटाचा निर्णय दादांनी घेतला आहे. आमदार नितीन पवार बारकाईने या सगळ्या योजनेबाबत लक्ष ठेवून आहेत. रक्षाबंधनापूर्वी 1 कोटी महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ देणार, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच, वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय देखील महायुतीच्या सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजना पास करण्याच्या आधी अर्थ विभागाने यावर आक्षेप नोंदवल्याची चर्चा होती. याबाबत आता अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी दहावा अर्थसंकल्प सादर केला. माझ्यावर दोन दिवस टीका झाली. अर्थ संकल्प मांडताना निधी नाही, अशी टीका झाली. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या देऊन लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा. हा चुनावी जमला आहे, असे म्हणण्यात आले. मात्र, ऑगस्ट महिन्यात दोन महिन्याचे पैसे महिलांना मिळतील. गरीब वर्गाला कशी मदत करता येईल, हाच प्रयत्न केला आहे. माझी लाडकी बहीण योजनेवर मी आक्षेप घेतला नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज पटापट अपलोड होईल, नवी वेबसाईट सुरु!