Kalkaji Temple Jagran Stage Collapses: नवी दिल्ली : देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत (Delhi News) कालकाजी मंदिर (Kalkaji Temple) परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. एका जागरण कार्यक्रमात व्यासपीठ कोसळून एकाचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, परवानगी नसतानाही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं समोर आलं असून आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना रात्री साडे बाराच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.


देशाची राजधानी दिल्लीतील कालकाजी मंदिरात रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली. प्रसिद्ध गायक बी प्राक (B Praak) याच्या एका कार्यक्रमा दरम्यान स्टेज कोसळल्यानं एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर, 17 जण जखमी झाले आहेत. जखमींना एम्स ट्रॉमा, सफदरजंग आणि मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गायक बी प्राक यानं या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे, सर्व जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे. 






दुर्घटनेत 17 जण जखमी, एकाचा मृत्यू 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी कालकाजी मंदिरात एका जागरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये रात्री साडेबाराच्या सुमारास 1500 ते 1600 लोकांची गर्दी जमली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी भीषण चेंगराचेंगरी झाली. जमाव आयोजक आणि व्हीआयपींच्या कुटुंबीयांसाठी बनवलेल्या स्टेजवर चढला, त्यानंतर स्टेज खाली पडला. या अपघातात स्टेजखाली बसलेले 17 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या मदत आणि बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. या दुर्घटनेबाबत बोलताना अग्निशमन दलाचे अधिकारी अतुल गर्ग यांनी सांगितलं की, अग्निशमन नियंत्रण कक्षाला साधारणतः रात्री 12 वाजून 47 मिनिटांच्या सुमारास माहिती मिळाली. कालकाजी मंदिरातील जागरण सोहळा पार पडला.  अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. कमला देवी (60), शीला मित्तल (81), सुनीता (5), हर्ष (21), अलका वर्मा (33), आरती वर्मा (18), रिशिता (17), मनू देवी (32) अशी जखमींची नावं आहेत. 


बी प्राक यांचं गाणं ऐकण्यासाठी जमलेली मोठी गर्दी 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालकाजी मंदिराच्या महंत परिसारात जागरणाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा जवान तैनात करण्यात आला होता. रात्री साडेबाराच्या सुमारास 1500-1600 लोकांचा जमाव तिथे जमला होता. त्याचवेळी चेंगराचेंगरी झाली. प्रसिद्ध गायक बी प्राकला पाहण्यासाठी गर्दी जमली होती.