नाशिक : येवल्यात (yeola) मराठा आंदोलक आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. रविवारी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) येवल्यात शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आले. त्यावेळी मराठा आंदोलक आणि भुजबळांचे समर्थक आमनेसामने आले. भुजबळ समर्थनार्थ व मराठा आंदोलक यांच्यात जोरदार राडा झाला. यानंतर आज छगन भुजबळ तडकाफडकी येवल्यात दाखल झाले आहेत. या राड्याबाबत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मी काल बाबा सिद्दिकींच्या दफणविधीच्या कार्यक्रमात होतो. तेव्हा मला समजले. छत्रपती शिवरायांच्या समोर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे हे अतिशय वेदनादायी आहे. जरांगे येणार होते, येवल्यातील मुक्तीभुमीला अभिवादन करणार होते आणि पटांगण येथे सभाही होती. त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले. त्याच्या बद्दल तक्रार नाही. मात्र त्यानंतर स्थानिक लोकांनी शिवीगाळ केली. उद्घाटन झाल्यावर तिथं 7-8 लोक माहिती देण्यासाठी असतात. लक्ष ठेऊन असतात. जरांगे यांच्या लोकांनी शिवीगाळ केली असे त्यांनी त्या लोकांना सांगितले. आपले लोक आतमध्ये होते, पोलीस नंतर आले. दरवाजावर लाथा मारायला लागले. महाराजांच्या वास्तूवर लाथा मारणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले.
निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्यांकडून हा पराक्रम
ते पुढे म्हणाले की, भुजबळांचा बॅनर फाडून टाकला. पण सोबत शिवाजी महाराजांचेही चित्र होते हे त्यांच्या लक्षात आले नाही. काही लोक निवडणुकीसाठी इच्छूक आहेत म्हणून त्यांनी हा पराक्रम केला, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. शिवाजी महाराजांच्या प्रांगणात का केले हे माहिती नाही. पण जरांगे आले त्यांनी शांततेत दर्शन घेतले. जे झाले त्याला काही इलाज नाही. आपल्या पेक्षा पोलिसांना जास्त माहिती होते. येवल्यातील जनता आणि महाराष्ट्रातील जनता याबाबत विचार करेल. महाराजांच्या द्वारावर लाथा मारल्या, नंतर महाराजांचेही फोटो फाडले. माझे ही सोबत फोटो होते, काही लोकांची समज नाही. माझे कार्यकर्ते शिवीगाळ कशाला करतील, शिवकालीन शस्र यासाठी देखभाल आणि माहिती देण्यासाठी आमचे लोक तिथले स्वयंसेवक होते, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
असा झाला होता राडा
मनोज जरांगे पाटील हे शिवसृष्टी येथे आल्यानंतर शिवसृष्टी स्वयंसेवक यांनी भुजबळ समर्थनार्थ व मराठा आंदोलक यांनी जरांगे समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. त्यानंतर मराठा आंदोलक यांनी शिवसृष्टीत ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांची जमवाजमव झाल्यानंतर शिवसृष्टी परिसरातील फलकांची तोडफोड करण्यात आली होती. संतप्त जमावाकडून मनमाड - कोपरगाव रस्त्यावरील विंचूर चौफुली येथे रास्ता - रोको आंदोलन करण्यात आले. रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना रास्ता रोको मागे घेण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. या घटनेनंतर शिवसृष्टी स्वयंसेवक, आंदोलक कार्यकर्ते व इतर अशा 40 ते 44 जणांविरुद्ध येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा