नाशिक : मनोज जरांगे यांच्या येवल्याच्या दौऱ्यावेळी मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं. मनोज जरांगे यांनी शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर मराठा आंदोलक आणि छगन भुजबळ समर्थक आमने-सामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मराठा आंदोलकांनी आक्रमक होऊन इंदुर-पुणे महामार्गावर रास्तारोको केला. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर मात्र मराठा आंदोलकांनी माघार घेतली आणि वाहतूक सुरळीत झाली. 


येवल्यात नेमकं काय घडलं? 


मनोज जरांगे हे छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणच्या शिवसृष्टीला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर मराठा आंदोलक आणि छगन भुजबळ समर्थकांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे शिवसृष्टी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं.


यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी शिवसृष्टी समोर ठिय्या मांडला. इंदुर-पुणे महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्तारोको केला. येवल्यात जरांगे समर्थकांनी इंदुर-पुणे महामार्ग रोखला. त्याचवेळी जरांगे आणि भुजबळ समर्थकांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 


मनोज जरांगेंचे आवाहन


रास्तारोको करणाऱ्या मराठा आंदोलकांना मनोज जरांगे यांनी संबोधन केलं आणि रास्तारोको मागे घेण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की, "आपला समाज एक झालाय, आपण न्यायाकडे जायचं आहे. आपली चूक नसली तरी ते म्हणतील तुमची चूक आहे. सत्ता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आता शांत बसा. दंगा करून काही होईल का? आज चांगला दिवस आहे. मराठा समाजावर मी अन्याय होऊ देणार नाही. राज्यात शांतता राखा. कारण राज्यात काहीतरी व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. काही झालं असेल तर मन मोठं करा आणि मागे व्हा. सगळ्यांनी शांतता राखा आणि पोलिसांना सहकार्य करा."


मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला आणि वाहतूक सुरळीत झाली. 


ओबीसींमध्ये 15 जातींचा समावेश, जरांगेंची टीका 


राज्य सरकारनं आणखी 15 जातींचा ओबीसींमध्ये समावेश करण्याची हालचाल सुरू केली आहे. केंद्रीय मागासवर्ग आयोगानं त्याची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्द केलीय. आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर तोफ डागली. येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला, आता या जातींना विरोध का नाही असा सवाल जरांगेंनी भुजबळांना केलाय. तसंच सरकारनं या जातींना ओबीसीत घेतांना महाविकास आघाडीकडून लिहून घेतलंय का असा खोचक सवालही त्यांनी केला. 


ही बातमी वाचा: