Nashik Chandwad News नाशिक : चांदवड तालुक्यातील तिसगांव येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या समर्थनार्थ ओबीसी समाज तिसगाव चांदवड तालुका ओबीसी, भटके, विमुक्त आरक्षण बचाव कँडल मोर्चा समता परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिलीप खैरे (Dillip khaire) व समता परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक (Balasaheb kardak) यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आला.
यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांवर जेसीबीमधून भव्य दिव्य फुलांची उधळण करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते मशाल ज्योत पेटवून कँडल मार्चचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर तिसगाव येथील युवा वर्गाच्या हस्ते दिलिप खैरे यांचा पगडी देऊन सत्कार करण्यात आला.
या घोषणांनी दुमदुमला परिसर
'समस्त ओबीसींची एकच चळवळ, छगन भुजबळ छगन भुजबळ', 'एकच पर्व,ओबीसी सर्व','भुजबळ साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'दिलीप आण्णा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
ओबीसी समाज एकवटला
यानंतर नंदू मंडलिक यांनी ओबीसी आरक्षण मोर्चाची गरज काय? याबाबतची माहिती दिली. रघुनाथ आहेर यांनी तिसगांव सोबतच चांदवड तालुका आता या लढाईत कुठेच मागे राहिला नाही, ओबीसी लढ्यात आम्ही तुमच्या सर्व बांधवांच्या सतत सोबत आहोत, असे सांगितले. सुनील पैठणकर म्हणाले की, ओबीसी समाजाची आता एकजूट झालेली आहे. त्यामुळे आपण कितीही मोठ्या संकटावर शंभर टक्के मात करू शकतो.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मात्र ओबीसी कोट्यातून नको
समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी घटनेचा आधार घेऊन आरक्षण चळवळ कायदेशीर भाषेत समजावून सांगितली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे परंतु ओबीसी कोट्यातून नको,त्याला आम्हा ओबीसी बांधवांचा विरोध आहे. आमचा लढा ना कुणाच्या विरोधासाठी, तो फक्त आमच्या संविधानिक हक्कासाठी असल्याचे यावेळी कर्डक यांनी सांगितले.
या कँडल मार्चला समता परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, जिल्हाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दराडे, अंबादास खैरे, समता परिषद नाशिक महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, समता परिषद नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भुजबळ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणखी वाचा