Ayodhya Ram Mandir नाशिक : अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण (Ram Mandir Inauguration) सोहळा पार पडणार आहे. यानिमित्त संपूर्ण अयोध्यानगरी (Ayodhya) सजली आहे. देशभरासह जगातील भाविक राम मंदिराची आतुरतेने वाट बघत आहे. राजकारणी नेत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक भाविक आपापल्या परीने मंदिराचे स्वागत करत आहे.
२२ जानेवारीला अयोध्येत रामलल्ला विराजमान होणार असल्याने हा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. राज्यभरात अनेक सार्वजनिक मंडळांकडून ढोल ताशाच्या तालावर वाजत गाजत श्रीरामाची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन हजार खडूंचे अयोध्या राम मंदिर साकारण्यात आले आहे.
तीन महिने परिश्रम घेत साकारले राम मंदिर
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सूक्ष्म मूर्तिकार संजय क्षत्रिय (Sanjay Kshatriya) यांनी 2 हजार खडूंच्या तुकड्यांपासून अयोध्येच्या राम लल्लाच्या मंदिराची हुबेहूब अशी आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. दीड बाय दोन असा या मंदिराचा आकार आहे. हे मंदिर बनवण्यासाठी त्यांनी जवळपास तीन महिने परिश्रम घेतले आहेत. मंदिरावर खडूपासून 7 कलशदेखील उभारण्यात आले आहेत. या मंदिराची नाशिक जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
नाशिकमध्ये 15 हजार मोतीचूर लाडूंचे वाटप
दरम्यान, नाशिकमध्ये नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने 22 जानेवारीला तब्बल 15 हजार साजूक तुपातील मोतीचूर लाडूचे श्रीरामाचा प्रसाद म्हणून रविवार कारंजा परिसरात वाटप करण्यात येणार आहे. हे लाडू बनवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी 1500 लिटर गाईचे तूप, 1600 किलो बेसन पीठ, 2 क्विंटल साखर, 22 किलो ड्रायफ्रुटस आणि 1 किलो इलायची पावडरचा वापर करण्यात आला असून राम नामाचा जप करत हे लाडू वळले जात आहेत.
रामलल्ला मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान
अयोध्या रामभक्तांच्या गर्दीने गजबजलेली पाहायला मिळत आहे. रामलल्लाचा बहुप्रतिक्षित प्राण प्रतिष्ठा, अभिषेक सोहळा आणि मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडणार आहे. प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटना पूर्वीचा उत्साह अयोध्यानगरीत दिसून येत आहे. शुक्रवारी म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली श्री रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली होती. गुरुवारी गर्भगृहात घटस्थापना सोहळ्यादरम्यान रामललाच्या मूर्तीचा पहिला फोटो समोर आला.
आणखी वाचा