Rohini Khadse नाशिक : प्रभू श्रीरामाचे (Ayodhya Ram Mandir) दर्शन घ्यायला आम्ही नंतर जाणारच आहोत. प्रभू श्रीराम हे फक्त भाजपचे दैवत नाही. आम्हाला देखील मंदिराचा अभिमान आहे. भाजप (BJP) मंदिराच्या निमित्ताने इव्हेंट करत आहे. या मंदिरासाठी माझ्या वडिलांनी लाठ्या खाल्ल्या आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केली.
महिला प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच त्या नाशिक (Nashik News) दौऱ्यावर आल्या असताना आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी खडसे बोलत होत्या. अयोध्येत मंदिर अपूर्ण असताना मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून हे चुकीचे आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून ही गर्दी कमी झाल्यानंतर नक्की दर्शनाला जाईल, असे त्या म्हणाल्या.
पवार साहेबांसोबतच राहणार - रोहिणी खडसे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचाराला मिळणारा प्रतिसाद संपूर्ण जनता बघत आहे पक्ष सोडून फक्त काही नेते गेले आहेत मात्र कार्यकर्ते व पदाधिकारी आजही पवार साहेबांना मानत असल्याने ते त्यांच्या सोबत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या दहा वर्षांत महिलांना खूप कमी संधी
शरद पवार यांनी महिला धोरण आणले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या काळात महिलांना मोठ्या संख्येने संधी देण्यात आली होती. मात्र गेल्या दहा वर्षांत महिलांना खूप कमी संधी देण्यात आली आहे. पक्षात आधीपासूनच महिलांचे संघटन आहे. आता त्याची मोठ्या प्रमाणावर बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. पक्षाने महिला प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिल्याने नाशिकमधील महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांची ओळख होण्याकरिता महिलांची भेट घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठा आरक्षण राज्यातच झुलवत ठेवलंय
मराठा आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देताना इतर आरक्षणाला धक्का लागू नये. वास्तविक पाहता केंद्राला आरक्षण देण्याचा अधिकार असताना देखील आरक्षणाला राज्यातच झुलवत ठेवले आहे. सरकारने लवकरात लवकर तो निर्णय घेणे गरजेचे आहे.
रोहिणी खडसेंचा भाजपला टोला
सध्या इडीकडून विरोधी पक्षातील नेत्यांना नोटीस बजावल्या जात आहेत. हे दबावतंत्र आहे. भाजप ज्यांच्या विरोधात बोलतो, त्याला इडीची नोटीस बजावली जाते. मग ती व्यक्ती भाजपमध्ये गेली की शुद्ध होऊन जाते, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
आणखी वाचा