Ashadhi Ekadashi Eid : 'अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण विठूमय झालं असून अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) येऊन ठेपली आहे. यंदा विशेष म्हणजे याच दिवशी बकरी ईदसुद्धा (Bakri Eid) साजरी केली जाणार आहे. मात्र बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचा आदर्श निर्णय नाशिकच्या चांदोरी येथील मुस्लिम बांधवानी घेतला आहे. तर जळगावच्या अमळनेर शहरात तर यंदा कुर्बानीच दिली जाणारा नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आला आहे.
हरिनामाचा गजर करत दिंड्या पताका घेऊन पायी दिंडी सोहळा सुरु आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला आहे. येत्या गुरुवारी 29 जून रोजी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यंदा आषाढी एकादशीच्या (Ashadhi Wari) दिवशीच बकरी ईद येत आहे. त्यामुळे दोन सणांचा अनोखा संगम यानिमित्ताने होत आहे. मात्र बकरी ईदला होत असलेली कुर्बानी रद्द करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांकडून घेतला जात आहे. ईद निमित्त सकाळी नमाज पठण करत त्या दिवशी कुर्बानी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचा कौतुकास्पद निर्णय नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सायखेडा पोलिस ठाणे हद्दीतील चांदोरी (Chandori) येथील सर्व मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.
यंदा आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण एकाच दिवशी येत आहे. या पार्श्वभूमीवर सायखेडा ग्रामीण पोलिस (Saykheda Police) ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी वाय कादरी यांनी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील प्रमुख हिंदू मुस्लिम बांधवांची बैठक घेऊन त्यांना बकरी ईदच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना दिल्या. मात्र बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने सर्व मुस्लिम बांधवांनी स्वखुशीने त्यांची बकरी ईदची कुर्बानी आषाढी एकादशीच्या दिवशी न देता एकादशीच्या दुसऱ्या दिवशी देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.तसेच त्या आषाढी एकादशीच्या दिवशी मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला.धर्माच्या नावावर हिंसा भडकावणाऱ्यांनी यातून शिकवण घेण्यासारखे आहे.
मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय
मुस्लिम समाजातर्फे अषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्याही जनावरांची कुर्बानी दिली जाणार नाही,असा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला.त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच पोलिसांनी केलेल्या आवाहनाचे पालन करण्याचा निर्णयास आमचा ही पाठिंबा असल्याचे मुस्लिम समुदायाने म्हटले आहे. तर सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील मुस्लिम बांधवांनी कौतुकास्पद निर्णय घेतला असून माजी त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी कायदा सुव्यवस्थेचे पालन करतांना सर्व नागरिकांनी धार्मिक सलोखा जपला जावा यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमळनेर शहरात यंदा कुर्बानी नाही!
आषाढी एकादशी आणि बकरी ईद यंदा 29 जून या एकाच दिवशी येत आहेत त्यामुळे अमळनेर शहरात तील मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीच्या दिवशी बकरीची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे येथील समाजबांधवांनी शांतता समितीची बैठक घेत पोलिसांच्या उपस्थितीत दोन्ही सणांच्या निमित्ताने परस्परांमध्ये आपुलकीचे संबंध निर्माण व्हावेत या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज बांधवांनी हा निर्णय घेतला आहे. यावेळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर म्हणाले की, अमळनेरला आदर्श इतिहास असून त्याला तडा जाऊ देऊ नका. अमळनेर ची प्रतिमा जपून ठेवा. प्रत्येकाने आपले स्वतःचे घर आणि आजूबाजूचे घर शांत केले तरी अनुचित प्रकार घडणार नाही. त्यामुळे यंदाच्या बकरी ईदला घेतलेला हा निर्णय अतिशय स्तुत्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.