एकीकडे राज्यात राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, वादांमुळे धार्मिक वातावरण कलुषित झाले आहे. राजकीय सत्ताधारी -विरोधक आपली भूमिका बजावत आहेत. मात्र दुसरीकडे वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे. आजही घर घर नल योजना नावालाच असल्याचा प्रत्यय येत असून नाशिक (Nashik) ग्रामीण भागातील माउल्यांना आजही डोंगर चढून उतरून पाण्याचा थेंबासाठी जीव धोक्यात घालावा लागण्याची परिस्थिती आहे. 


राज्यात जलजीवन मिशनचा देऊन कागदावर कागद रचले, योजना आल्या, विहिरी झाल्या, पाणी आले, मात्र ते फक्त कागदावरच असल्याचे चित्र आहे. कारण आजही अनेक भागात तीव्र पाणीटंचाई जाणवते आहे. महिलांच्या जीवनात रोजचा संघर्ष असून निम्मं आयुष्य पाणी वाहण्यात चालल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. एक हंडा पाण्यासाठी रात्र रात्रभर विहिरीजवळ, हातपंपाजवळ मुक्काम करावा लागत आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) म्हणतात, माझ्या खिशाला दोन दोन पेन असून उठता-बसता, चालता फिरता नुसत्या प्रकल्पावर, कामांच्या मंजुरीवर सह्या करत असल्याचे ते म्हणाले. मात्र इतक्या सह्या करूनही आजही अनेक भागातील पाणी प्रश्न का मिटत नाही. पाणी प्रश्नांची फाईल मंत्रालयापर्यत पोहोचलीच नसेल का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे. 


आजघडीला नाशिक जिल्ह्याचा विचार केला तरी गेल्या अनेक वर्षांपासून मार्च महिन्यापासून ते जून पर्यंत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अशातच निम्मा दिवस जर पाणी आणण्यात जात असेल तर, मजुरीवर कधी जायचं, खायचं कधी असा पेचप्रसंग या नागरिकांसमोर उभा राहतो. परिणामी नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबक (Trimbakeshwer) तालुक्यातील अनेक नागरिक स्थलांतर करत असतात. मुळात त्र्यंबक तालुका हा आदिवासी तालुका असून इथली जनता पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यातही पावसाच्या पाण्यावर अधिकची शेती केली जाते. मात्र जसजसा मार्च महिना सुरु होतो, तसतशी पाण्याची बिकट समस्या या लोकांना भेडसावते. परिणामी घरातील महिला, लहान मुली पाण्यासाठी (Water Crisis) दाहीदिशा हिंडत असतात. कुठे नदीवर, तर कुठे झिऱ्यावर मैल अन् मैल फिरत असतात. मात्र पाणी कुठेच सापडत नाही, सापडते ती फक्त निराशा.... 


एकीकडे जलजीवनची मोठी जाहिरात सरकारकडून, स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येते. त्याचबरोबर कामांचा पसारा देखील दाखविण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी पाहायला मिळते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांना लागूनच विहिरी आढळून येतील, मात्र पाण्याचा थेंब दिसणार नाही. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना देखील एकदा नव्हे दोन तीनदा झाल्याचे गावकरी सांगतात. मात्र प्रत्यक्षात नळ आहे, मात्र पाणीच नाही.. म्हणायला गावाला नळ पाणी पुरवठा योजना अन् महिलांच्या डोक्यावरील हंडा तसाच.... गेल्या अनेक वर्षांपासूनची अशीच परिस्थिती असून मागील वर्षीचा शेंद्रीपाडा असो की आता पाणीटंचाई गावे असोत, सगळीकडे चित्र सारखेच. मग हे बदलणार कधी? 


गावात दारू उपलब्ध होते, मात्र पिण्याचे पाणी नाही.. 


सामाजिक कार्यकर्त्या मयुरी धुमाळ यांनी नुकताच एका सर्वेक्षणांती पाणी प्रश्नांवर अहवाल सादर केला. त्यानुसार त्र्यंबक तालुक्यातील हर्सूलजवळच्या गावातील महिलांना सगळी कामे सोडून पाण्यासाठी धावावं लागत. विहिरी, हातपंपाजवळ बसून राहाव लागत. महिलांच्या म्हणण्यानुसार गावात दारू सहज उपलब्ध होते, मात्र पिण्याची पाण्याची सोय होत नाही, ही येथील शोकांतिका आहे. गावातील महिला परिसरातील पाणी भरण्यासाठी हातपंपावर जवळ रात्र झोपून काढावी लागते. अन् एकदा नंबर आला कि रात्रभर पाणीच वाहायचं, असं एकूण चित्र आहे. त्यामुळे प्रश्न फक्त पाण्याच्या उपलब्धतेचा नाही, तर महिलांच्या आयुष्याशी निगडित आहे. पाण्यासाठी इतके कष्ट घ्यावे लागतात, महिला मुलींना वणवण भटकावे लागते? हा संघर्ष कधी थांबणार? हर घर जल योजना कधी पोहचणार? असे असंख्य सवाल उपस्थित होतात. 


नुसते आरोपांचे राजकारण...


एकूणच केंद्र सरकार राज्य सरकार जनतेच्या भल्यासाठी निर्णय घेत असते. जनतेचे जगणे सुखकर व्हावे म्हणून असंख्य योजना लागू करते. मग तरीदेखील अजूनही पाण्यासाठी वणवण का? वेगवेगळ्या योजना राज्यात लागू करत असताना, पाणी प्रश्न कुणालाच दिसत नाही का? महिलांचा पाण्यासाठीचा संघर्ष कुणाला दिसत नाही? सरकार इतर योजना कमी करून पाणी प्रश्नाला प्राधान्य का देत नाही? नुसते आरोपांचे राजकारण सुरु आहे, मात्र इथल्या महिलांना पाण्यासाठी रोजच मरणयातना सहन कराव्या लागत असताना, कुठे आहे महाराष्ट्राचे पाणी धोरण? हे सगळे आणि सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत, होत राहतील, जोपर्यंत या महिलांच्या डोक्यावरचा हंडा, कमरेवर आणि कमरेवरच्या हंडा खाली येत नाही तोपर्यंत..... !