नाशिक : देवळाली कॅम्प (Deolali Camp) येथील लष्कराच्या आर्टिलरी सेंटरमध्ये (Artillery Center) तोफांच्या सरावादरम्यान झालेल्या स्फोटात दोन अग्नीवीर (Agniveer) जवान मृत्युमुखी पडले. तर एक जण गंभीर जखमी झाला. गोहिल विश्वराज सिंग (20, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) आणि सैफत शित (21, रा. जामनगर, गुजरात) अशी मृत्यू झालेल्या अग्निवीरांची नावे आहेत. तर अप्पा स्वामी हा अग्नीवीर जखमी असून उपचार सुरु आहेत. फुटलेल्या बॉम्बचे लोखंडी पत्रे आणि तुकडे शरीरात घुसल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आर्टिलरी सेंटरमध्ये घडलेल्या घटनेची आता चौकशी होणार आहे. आर्मी कमांडर यांनी 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे (Court of Inquiry)आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळाली कॅम्प परिसरात आशियातील सर्वात मोठे तोफखाना केंद्र सन 1947 पासून कार्यान्वित असून तिथे भारतीय सैन्य दलातील अधिकारी व जवानांना युद्धाभ्यास व इतर लष्करी सामग्रीचे प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे, बोफोर्स तोफांचे प्रशिक्षण व सरावासाठी तिथे जागा राखीव आहे. तिथे अग्निवीरांच्या तुकडीचे प्रशिक्षण व सराव सुरू असताना घडलेल्या दुर्घटनेमुळे शोक व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी दुपारी आर्टिलरी सेंटरच्या 'फायरिंग रेंज' मध्ये सरावाला सुरूवात झाली. तिथे 'इंडियन फिल्डगन' द्वारे 'फायरिंग' चा सराव सुरू होता. तिथे लावलेल्या प्रत्येक तोफांजवळ सात अग्निवीरांचा गट तोफेत गोळा टाकून 'लक्ष्य' भेदत होता. त्यादरम्यान, चार क्रमांकाच्या तोफेत बॉम्ब भरताना स्फोट झाला. बॉम्बचे तुकडे गोहिल व सैफत यांच्या शरीरात शिरल्याने दोघेही मृत पावले.'फायरिंग'च्या सरावावेळी स्फोट झाल्याने जखमी झालेल्या गोहित, सैफत व अप्पा यांना नाईक सचिन चव्हाण, नायब सुभेदार सुदेश मामेन, सुंदरराज यांनी लष्करी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी गोहिल व सैफत यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन किलोमीटर अंतराच्या 'फायरिंग रेंज' मधून 17.4 किलोमीटर अंतरापर्यंत तोफ डागण्यात आली. तर जखमी अग्निवीराच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. तर तोफेच्या सरावापूर्वी तज्ज्ञ पथकाद्वारे 'गन व बॉम्ब'ची तपासणी केली जाते. त्यानंतरच सरावासाठी तोफ 'फायरिंग रेंज'वर आणली जाते. तरीही झालेल्या दुर्घटनेमुळे त्याची खात्यांतर्गत चौकशी लष्कराने सुरु केल्याचे समजते.
'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश
या दुर्घटनेबद्दल सदन कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेट यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसंच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले गणर अग्नीवीर गोहिल विश्वराज सिंह आणि सैकत शीत यांच्या कुटुंबाप्रती त्यांनी मनापासून संवेदना व्यक्त करत फिल्ड फायरिंग दुर्घटनेच्या मूळ कारण शोधण्यासाठी 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी' सुरू करण्यात आली आहे, असे अधिकृतरित्या दक्षिण कमांडच्या एक्स हॅन्डलवरून त्यांनी जाहीर केले आहे.
आणखी वाचा