Anandacha Shidha : नाशिक (Nashik) शहर जिल्ह्यातील अनेक भागात काही प्रमाणात आनंदाचा शिधा (Diwali Kit) पोहोचला असला तरी पॉश मशीनचे सर्व्हर डाऊन (Server Down) असल्याने आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) वाटपात अडचणी येत होत्या. मात्र आता आनंदाचा शिधा ऑनलाईन नाही तर ऑफलाईन वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शिधाधारकांपर्यंत शिधा पोहचण्यास मदत होणार आहे.
यंदा दिवाळी निमित्ताने राज्य सरकारतर्फे शंभर रुपयांत राज्यात रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. सुरुवातीला पॅकेटवर फोटो छापण्यामुळे विलंब झाला. त्यानंतर काही ठिकाणी शिधा पोहचण्यास उशीर झाला. आता सर्व्हर डाऊनमुळे पॉश मशीन बंद असल्याने शिधा वाटप बंद करण्यात आले होते. मात्र दुसरीकडे दिवाळी सरत असल्याने दिवाळीनंतर शिधा घेऊन उपयोग काय? अशी ओरड जनमानसातून करण्यात येत होती. मात्र आता सर्वांपर्यत शिधा पोहचणार असून ऑनलाईन नाहीतर ऑफलाईन शिधा वाटपास सुरुवात झाली आहे.
राज्यभरातील पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी निमित्ताने चार वस्तू असलेल्या दिवाळी किट म्हणजेच आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील काही तालुके आणि शहरांतील काही भागात दिवाळीचे किट पोहोचले असले तरी कार्डधारकांना दिवाळी रेशनचे किट मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊनमुळे आनंदाचा शिधा मिळण्यास अडचण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या आदेशानुसार पुरवठा विभागाने जेथे अडचण असेल तेथे ऑफलाइन दिवाळीची किट वाटप करण्याच्या सूचना रास्त भाव दुकानदारांना दिल्या आहेत. ऑफलाईन किट वितरणाची मोजदाद मात्र दुकानदारांना ठेवावी लागणार आहे.
पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश
नाशिक जिल्ह्यात सर्वत्र गोंधळ निर्माण झाल्याने राज्य शासनाकडून दखल घेण्यात आली असून शासनाने सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी ऑफलाईन वितरण करण्याचे आदेश केले आहेत. ज्या ठिकाणी आनंदाचा शिधा ऑनलाइन सुविधा सुरळीत सुरू आहे, तेथे ऑनलाईन वितरण करण्यात यावे. मात्र जेथे ऑनलाईनसाठी अडचणी येत असतील किंवा वेळ लागत असेल अशा ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने वाटप करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ही सुविधा केवळ आनंदाचा शिरा या दिवाळी भेटवस्तूंसाठीच असणार आहे.
अशी आहे ऑफलाईन प्रक्रिया
जे रेशन दुकानदार ऑफलाईन दिवाळीचा आनंदाचा शिधा वाटप करणार आहेत. त्यांना वितरणची माहिती असेल तर रजिस्टरमध्ये नोंदवावी लागेल. नोंद घेताना लाभधारकांचे नाव शिधापत्रिकेचे शेवटचे चार अंक मोबाईल क्रमांक दिलेल्या शिधा वस्तूंचा तपशील, प्राप्त रक्कम आणि लाभ धारकाचे सही घ्यावी लागणार आहे.
दुकानदारांना डबल ताण
सुरुवातीपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन दुकानांमधून वस्तू मिळण्यास विलंब होत आहे. काही कार्डधारकांना दिवाळीचा आनंदाचा शिधा मिळाला आहे, तर काहींना तांत्रिक अडचणीमुळे अद्यापही आनंदाचा शिधा मिळू शकलेला नाही.
दुकानदार देखील यामुळे अडचणीत आले आहेत. कार्डधारकांकडून सातत्याने विचारणा होत असताना दिवाळीचा शिधा ज्या दुकानांमध्ये पोहोचलेला आहे. अशा दुकानदारांना सर्व्हर डाऊनमुळे वितरणाचा अडचणी येत होत्या. त्यामुळे कार्डधारक आणि दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग देखील निर्माण झाले ते पाहायला मिळाले.