मुंबई : राज्यातील सर्वसामान्यांची दिवाळी (Diwali) गोड व्हावी यासाठी फक्त 100 रुपयांमधे प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. राज्यातील सात कोटी व्यक्तींना याचा फायदा होईल असं सांगण्यात आलं. त्यासाठी घाईघाईत एका संस्थेला 513 कोटी रुपयांचं कंत्राट देखील देण्यात आलं. मात्र दिवाळी तोंडावर आलेली असताना देखील हा आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत अद्याप पोहोचलेला नाही.   


सर्वांचा आवडता सण असलेल्या दिवाळीला आता काही दिवस उरले आहेत.  त्यामुळे फराळाचे पदार्थ बनवण्याचे वेध लागलेल्या गृहिणी स्वस्त धान्य दुकानांमधे 100 रुपयांत मिळणारा आनंदाचा शिधा घेण्यासाठी पोहोचत आहेत. फक्त शंभर रुपयांमधे एक किलो रवा, एक किलो चनाडाळ, एक किलो साखर आणि एक किलो तेल देण्यात येईल असं राज्य सरकारने जाहीर केलंय. आपलीही दिवाळी गोड होईल या आशेने लोक दुकानांमधे पोहोचत आहेत. पण ग्राहकांना फक्त जाहिरातीवरच  समाधान मानावं लागतय. कारण सरकारचा हा आनंदाचा शिधा अद्याप स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचलाच नाही.  


राज्य सरकारकडून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन या संस्थेला 509 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय. मात्र त्यासाठी आधी कंत्राट आणि नंतर मंत्रिमंडळाची मंजुरी असा उलटा प्रकार करण्यात आलाय. ज्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन संस्थेला हे  कंत्राट देण्यात आलय ती संस्था स्वतः या पदार्थांचा पुरवठा करणार नसून त्यासाठी या संस्थेकडून पुरवठादार कंपन्यांना कंत्राट देण्यात आलय, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान,  कंत्राटाची ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आल्याचा आणि लवकरच लोकांना शिधा मिळेल असा दावा रविंद्र चव्हाण यांनी केलाय.  


राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्यात येणार आहे. राज्यातील सात कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ होईल असा दावा करण्यात आलाय. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारा शिधा पुरवठा कंपन्या इतक्या कमी कालावधीत कसा मिळवणार हा प्रश्न आहे. कारण या शिधा वाटपातील म्हणत्वाची अडचण आहे ती म्हणजे हा शिधा ज्या पिशव्यांमधून वाटायचा आहे, त्या पिशव्या उपलब्ध करणं. कारण या पिशव्यांवर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो छापले जाणार आहेत. फोटो छापलेल्या या पिशव्यांमधूनच हे चार पदार्थ एकत्रित एका कीटच्या स्वरुपात देण्याचे आदेश आहेत. त्यामुळे चारही वस्तू आणि त्यासाठीची पिशवी उपलब्ध झाल्यावरच या वस्तू गरजुंपर्यंत पोहचणार आहेत. )


10 ऑक्टोबरपासून हा शिधा मिळेल असं आधी जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर ही तारीख वाढवून 15 ऑक्टोबर करण्यात आली. ती देखील उलटली मात्र तरीही शिधा दुकानापर्यंत पोहोचलेला नाही. गृहिणी दुकानांमधे दररोज शिधा आला का? म्हणून चौकशी करत आहेत. पण त्यांना मोकळ्या पिशवीसह परतावं लागतय.  त्यामुळे दिवाळीच्या आधी हा शिधा आपल्याला मिळेल का हा प्रश्न त्यांना पडलाय.