Malegaon Kutta Goli Seized : नाशिकच्या (Nashik) मालेगावमध्ये नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कुत्ता गोळीसह (अल्प्राझोलम) गुंगीकारक औषधांचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. मालेगावच्या (Malegaon) अहमदपुरा भागात कुत्ता गोळीची (Kutta Goli) विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने सापळा रचून दोघा संशयितांना घटनास्थळावरुन कुत्ता गोळीसह ताब्यात घेतले तर एक जण यावेळी फरार झाला. ताब्यात घेतलेल्या संशयितांनी मिळालेल्या माहितीवरुन आणखी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण 15 हजार 800 कुत्ता गोळी, 25 बॉटल नशेसाठी वापरले जाणारे औषध, एक दुचाकी असा  2 लाख 1 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पवारवाडी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


काय आहे कुत्ता गोळी?


'अल्प्राझोलम' (Alprazolam) नावाची ही गोळी झोप न येणे व मेंदूशी संबंधित रुग्णाला दिली जाते. काही उत्तेजक पदार्थांपासून गोळीची निर्मिती होते. गोळीच्या अतिसेवनाने शरीर बधीर होतं. याशिवाय मानसिक संतुलनही बिघडण्याची शक्यता आहे. मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या या गोळ्यांच्या सेवनाने नशेखोर व्यक्ती आपल्याच धुंदीत राहतो. त्यामुळे त्यांचं आयुष्य वाया जाण्याचा धोका निर्माण होतो. 


डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीसाठी मनाई


ही टॅब्लेट शेड्युल वन कॅटेगरीत येते. या गोळीत उत्तेजक पदार्थ असल्याने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीसाठी मनाई आहे. मात्र मालेगाव शहरात या गोळीची सर्रास बेकायदेशीर विक्री होत असते. ही गोळी 12 तासापर्यंत काम करते. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व नशेच्या आहारी गेलेले लोक या गोळीचे सेवन करतात. या गोळीची एक स्ट्रीप 83 रुपयांना मिळते, बाजारात ती स्ट्रिप अवैध मार्गाने दीडशे रुपयांना विकली जाते. या   Rexon T, Conex T, Codeine अशा औषधाच्या बाटल्या देखील नशेसाठी वापरल्या जातात. गुंगी येण्यासाठी या औषधांचा वापर होतो.


मालेगावातील तरुण कुत्ता गोळीच्या आहारी


गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये कुत्ता गोळीचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले आहे. त्याबाबत पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई देखील केली जात आहे. मात्र तरुणाई व्यसनाच्या आहारी जात असल्याने मुस्लिम संघटना आणि मालेगाव पोलीसांनी याबाबत जनजागृती करत कुत्ता गोळीपासून दूर राहा याबाबत आवाहन केलं जात आहे. मात्र, दारुची नशा महागडी वाटत असल्याने अवघ्या काही पैशात रुपयांना मिळणारी कुत्ता गोळी नशेसाठी सोपी असल्याने तरुणाई आहारी जात आहे.

हेही वाचा


मालेगावात तरुणांमध्ये कुत्ता गोळीची झिंग! नाशिक पोलिसांनी केली जबरदस्त कामगिरी - काय आहे नेमकी ही कुत्ता गोळी...