नाशिक : आजपर्यंत बांधल्या नाही एवढ्या राख्या तीन दिवसांत बांधल्या आहेत. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या सिन्नर (Sinnar) विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेतील (Jansanman Yatra) सभेतून ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, राज्यातील यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर काय कामे केली हे सांगत आहे. भांगरे यांच्या स्मारकासाठी मागणी केली आहे. त्याची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे ते कसे पूर्ण होईल यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत. सिन्नरची वसाहत चांगल्यापैकी सुरू आहे. एमआयडीसी आणि महावितरणचे प्रमुख उदय सामंत यांना बोलावून आम्ही येथील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे करण्यासाठी माझाही प्रयत्न आहे. सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीबाबत ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
राज्यातील मुलामुलींना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. मी आता इथे आलो तेव्हा रथात बसलो, लग्नात बसतो तसे बसवले. नववधू आणि नवरदेवाला बसवतात तसे बसलो. आम्ही लग्नात घोड्यावर ही बसलो नव्हतो ते आता पुरे करून घेतले, अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी यावेळी केली. आजपर्यंत बांधल्या नाही एवढ्या राख्या तीन दिवसांत बांधल्या आहेत. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, आर्थिक शिस्त आम्हाला कळते 10 वर्ष अर्थसंकल्प सादर करणे हे येड्या गबळ्याचे काम नाही, असा शब्द अजित पवारांनी उपस्थितांना दिला आहे.
त्यांना दीड हजार रुपयांची किंमत काय कळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर (CM Ladki Bahin Yojana) विरोधक टीका करताय. तुम्ही सरकारमध्ये असून काय केले? देवळात वाजवण्याची घंटा ही दिली नाही. टीका करणारे सोन्याचा चमचा घेऊन येणारे आहेत. त्यांना दीड हजार रुपयांची किंमत काय कळणार, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
विरोधक खोटे नेरेटिव्ह सेट करताय
इंडिया बुल्स कंपनीचे एक युनिट विलासराव देशमुख यांच्या काळात इथे काढले. नंतर ते अडचणीत आले, पण आता काळजी करू नका. इंडस्ट्री सबंधित जे जे निवेदन आलेत, त्याबाबत सोमवार प्रयत्न सर्वांनी तयारी करून मंगळवारी आले पाहिजे. आपले उद्योग जातात, असे विरोधक सांगत आहेत, तसे नाही. जिंदाल, टोयोटा यांचे युनिट आपल्याकडे आले आहे. हे खोटे नेरेटिव्ह सेट करतात, उद्योग चालले सांगतात, कसले उद्योग चालले? एमआयडीसीचा वारेमाप मोबदला मिळाला पाहिजे, यासाठी एमआयडीसी नाही. उद्योजकांना परवडले पाहिजे, यासाठी एमआयडीसी आहे.
आणखी वाचा
पैठणीचं जॅकेट घातलं, बायको म्हणंल लग्नात नाही घातलं आणि आता कसं घातलं रं उतारवयात : अजित पवार