नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. नुकतेच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) नाशिक दौऱ्यावर आले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिकमधील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला होता. या पाठोपाठ आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मात्र अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्यावर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या उपस्थितीबाबतही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 


आज कळवण-सुरगाणा मतदारसंघातील (Kalwan-Surgana Constituency) विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थिती लावणार आहेत. यात सुरगाणा येथे शेतकरी व कृतज्ञता मेळावा, कळवण बसस्थानकाचे भूमिपूजन, कळवण नगरपंचायत येथील नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा, नांदुरी ते सप्तशृंगी गड रस्त्याचे भूमिपूजन आणि नांदुरी येथील बसस्थानकाचे भूमिपूजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 


छगन भुजबळ-नरहरी झिरवाळांची दांडी? 


अजित पवार हे आज कळवण-सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना छगन भुजबळ मात्र येवला मतदार संघाचा दौरा करणार आहेत. अजित पवार यांच्या दौऱ्यात छगन भुजबळ उपस्थित राहणार नाहीत. येवला मतदारसंघात विविध नियोजित कार्यक्रमांना छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीबाबतही प्रश्नचिन्ह आहेत. छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिकमधील ज्येष्ठ नेते असून ते आज अजित पवारांच्या दौऱ्याला दांडी मारणार का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  


सांगलीत 11 ऑगस्टला ओबीसी मेळावा


दरम्यान, ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांचा एल्गार पुकारण्यासाठी 11 ऑगस्टला सांगलीत ओबीसी मेळाव्याकडून आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, पंकजा मुंडे  उपस्थित राहणार आहेत. ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी ही माहिती दिलीय. राज्यातील सर्व ओबीसी आता पेटून उठले आहेत. ते आता स्वबळावर विधानसभा  निवडणूक लढवणार आहेत. ओबीसीच्या मतावर सहज निवडून येणे शक्य असल्याने आता कुठलाच ओबीसी नेता कुठल्याच राजकीय पक्षाकडे उमेदवारीची भीक मागणार नाही. स्वबळावर ओबीसीची सत्ता स्थापन करणार अशी घोषणाच माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केलीय.


इतर महत्वाच्या बातम्या 


वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्री अजित पवार 'ॲक्शन मोड 'वर! पुढील 10 दिवसात मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास...


दिंडोरीतून नरहरी झिरवाळांच्या उमेदवारीला शिवसेनेचे आव्हान, शिंदे गटाच्या नेत्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, महायुतीत तणाव