नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) दौरा केला. यात दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या नावाची जागावाटपाआधीच घोषणा केली. मात्र सुनील तटकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर महायुतीत (Mahayuti) तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.   


नरहरी झिरवाळ यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटातून (Shiv Sena Shinde Group) आव्हान देण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताच महायुतीत जागा वाटपावरून लोकसभा निवडणुकी सारखीच रस्सीखेच होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. 


धनराज महालेंचा नरहरी झिरवाळ यांच्यावर गंभीर आरोप


सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महायुतीत तणाव वाढल्याचे चित्र आहे. दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले (Dhanraj Mahale) यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सुनील तटकरेंनी उमेदवारी जाहीर करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत झिरवाळ पिता-पुत्राने शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांचे काम केल्याचा आरोप देखील धनराज महाले यांनी केला आहे. उमेदवारीचा निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तेव्हाच मुख्यमंत्र्यांकडून उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यामुळे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येते. 


काय म्हणाले होते सुनील तटकरे? 


नरहरी झिरवाळ हे अख्या राज्याचे, सर्व समाजाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. ते केवळ आदिवासींचे नेते नाहीत. झिरवाळ काय करणार? हा प्रश्न उपस्थित होतोय. झिरवाळ साहेब एकच करणार, जी टोपी तटकरेंच्या डोक्यावर घातली, त्या टोपीसह अजितदादांनी सोबत राहणार आहे. इथले उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढतील. मी मुद्दाम नाव घेतले नव्हतं, पण तुम्ही विचारणार म्हणून सांगतो, त्यांचे नाव आहे नरहरी झिरवाळ, असे म्हणत सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली. 


आणखी वाचा 


Narhari Zirwal : 'माझ्या मुलाने काहीही सांगितलं तरी, दादा म्हणजे दादाच'; नरहरी झिरवाळांनी अखेर स्पष्ट केली भूमिका!