नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) महाराष्ट्र आणि झारखंड (Maharashtra Vidhansabha Election 2024) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीचे मतदान कधी असणार याचा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तवला आहे.
आमदार सरोज आहिरे (Saroj Ahire) यांच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात (Deolali Assembly Constituency) विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे.
मतदानाबाबत अजित पवारांचा अंदाज
अजित पवार म्हणाले की, आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. आज निवडणूक जाहीर होईल, असा माझा अनुभव आहे. दसरा दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नावेळी मतदान असेल, असा माझा अंदाज आहे. दुपारी 3 नंतर कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही, म्हणून आज सकाळी आलो असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आज तीन वाजता आचारसंहिता लागेल
आपल्या पक्षाचा भक्कम नेता बाबा सिद्धिकी आपण गमावला आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सतत लोकांशी संपर्क ठेवतोय, काम करतोय. आम्ही जात-पात बघत नाही. 18 पगड जाती घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्या पद्धतीने यशवंतराव चव्हाण यांनी जसे सुसंस्कृत राज्य चालवले तसे आम्ही करत आहोत. यापुढे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून प्रचाराला यायचे आहे. आज तीन वाजता आचारसंहिता लागणार आहे. त्या आधी अनेक मतदारसंघाला निधी मंजुर होईल, असे सांगूनच मी इथे आलो आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
मी जगातील सर्वाधिक भाग्यवान भाऊ
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सबल करायचे आहे. आचारसंहिता पहिल्या आठवड्यात लागणार हे माहिती होते, म्हणून लवकर खात्यात पैसे टाकले. राखी पौर्णिमेनिमित्त जे पैसे दिले त्याप्रमाणे भाऊबीजची ओवाळणी दिल्यानं खूप समाधान मिळाले. काही लोकांच्या पोटात दुखले, काही जण कोर्टात गेले. मी बहिणींचा ऋणी आहे. मी जगातील सर्वाधिक भाग्यवान भाऊ आहे. हजारो राख्या मला बांधल्या. यंदाची राखी पौर्णिमा मी आयुष्यात विसरू शकणार नाही.
इतक्या दिवस झोपा काढल्या का?
तुमच्या प्रपंचावर आर्थिक मदत करणारी ही निवडणूक आहे. तुम्ही महायुती ला विजयी करा, तुमची योजना चालू ठेवण्याची माझी जबाबदारी आहे. आता विरोधक म्हणतात की, आम्ही योजना देऊ. मग इतक्या दिवस झोपा काढल्या का? आता म्हणतात बहिणींना दिले भावाला नाही. आम्ही भावासाठी, शेतकऱ्यांसाठी योजना आणल्यात. नाशिकचे आमदार फोन करून सांगतात की, विजेचा प्रश्न आहे, त्यानंतर मी अधिकाऱ्यांना बोलावले, शेतकऱ्यांना वीज का नाही असे विचारले. विलासराव देशमुख यांच्या काळात निवडणुकीआधी वीजबिल माफ केले. निवडणुकीनंतर त्यांनी सांगितले आपल्याला माफ करता येणार नाही, मी त्यांना बोललो की, असे कसे? आपण लोकांना फसवतो आहे. हे तुमचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे सरकार आहे. आम्ही सर्वांना मदत करतो. 44 लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा