अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar) शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्ह्यासाठी अभिनंदनीय बाब घडली असून जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन शाळेमध्ये अहमदनगरच्या स्नेहालय इंग्लिश मीडियम (Snehalay English school) शाळेचा समावेश झाला आहे. प्रतिकूलतेवर यशस्वी मात करत वंचितापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याच्या स्नेहालयच्या मागील दीड दशकांच्या प्रयत्न आहे आणि याचीच दखल घेऊन इंग्लंड मधील T4 Education संस्थेने जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन शाळेमध्ये स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कुलची निवड केली आहे. 


अहमदनगर जिल्ह्यातील स्नेहालय (Snehalay) इंग्लिश मीडियम स्कूल ही एक धर्मादाय शाळा आहे. इथे अनाथ, एचआयव्हीग्रस्त (HIV) आणि सेक्स वर्कर कुटुंबातील मुलांना शिक्षण देऊन त्यांचे जीवन बदलण्याचे मोठे काम केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर 'प्रतिकूल परिस्थितीवर मात' या श्रेणीत स्नेहालय स्कुलची निवड झाली आहे. स्नेहालय शाळा ही एकमेव भारतीय शाळा आहे. जीची T4 Education संस्थेने जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन शाळेमध्ये निवड केली आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये अनाथ, वंचित मुलं, सेक्सवर्कर्स (sex Workers) यांची मुलं तसेच एचआयव्ही बाधित मुलं शिक्षण घेतात. जवळपास 350 विद्यार्थ्यांना इथे शिक्षण दिलं जातं. स्नेहालय संस्थेतील मुलांना नगर शहरातील चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे यासाठी 2010 मध्ये स्नेहालय संस्थेचे डॉ गिरीश कुलकर्णी हे गेले, तेंव्हा शहरातील शाळांनी या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला त्यामुळे स्नेहालय इंग्लिश मिडियम स्कुलची कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि आज छोट्याश्या रोपट्याचे वटवृक्ष झालं आहे. आज शाळेचं नाव जागतिक पातळीवर पोहचले आहे.


प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या मुलांसमोर गुंतागुंतीचे सामाजिक-भावनिक प्रश्न असतात. त्यासाठी त्यांना या स्थितीला योग्य प्रतिसाद देण्याचे आणि अनुरूप  कौशल्यांचे शिक्षण स्नेहालयने दिले. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास तसेच शाळेची एक समुदाय म्हणून ओळख विकसित केली. एचआयव्ही/एड्सग्रस्त मुलांचे, वेश्या व्यवसायातील बळी महिलांच्या मुलांचे, अन्य सामाजिक कुप्रथांचे बळी ठरलेल्या हक्कवंचित बालकांचे जीवन बदलण्यासाठी केलेल्या सजग प्रयत्नांमुळे स्नेहालय शाळा टी 4 परीक्षणात निवडली गेली. यात या शाळेच्या शिक्षकांचेही मोठे योगदान आहे.


अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास 


सध्या स्नेहालय शाळेतील 70 टक्के विद्यार्थी हे संस्थेच्या, बाहेरील कुटुंबांमधून येत आहेत. मागील 3 वर्ष इयत्ता 10 वीचा निकाल 100 टक्के लागला. शाळेचा असामान्य दर्जा आणि विविधांगी उपक्रम आता सर्व स्तरातील विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करीत आहेत. शाळेत केवळ अभ्यासक्रमावरच भर दिला जात नाही तर विद्यार्थ्यांच्या कला गुणांना देखील वाव दिला जातो सोबतच त्यांच्या कौशल्य विकासावरही भर देऊन त्यांना भविष्यात स्वतःच्या पायावर कसं उभं राहाता येईल यासाठी इथे कौशल्य विकास केंद्र देखील उभारण्यात आले आहे. सोबतच संगीत, कला, क्रीडा विभाग देखील या शाळेत उभारण्यात आला आहे. 


सहा हजार पुस्तकांच भव्य ग्रंथालय 


मुलांना पुस्तके वाचण्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी इथे भव्य ग्रंथालय आहे, जिथे सहा हजारांच्या वर पुस्तक आहेत. कौशल्य विकास केंद्रातून शिक्षण घेऊन गेलेल्या मुलांना नगरच्या एमआयडीसीमध्ये नोकरी देखील मिळाल्याचे इथले प्रशिक्षक सांगतात. स्नेहालय शाळेचा समावेश पहिल्या तीन शाळांमध्ये झाला असला तरी लवकरच जगातील सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांकाच्या शाळेचा सन्मान व्हावा यासाठी शाळा प्रयत्न करत आहे. इंग्लंड आणि जेरुसलेम येथील अन्य दोन शाळा स्नेहालय सोबत स्पर्धेत आहेत. स्नेहालयचा हा झालेला गौरव केवळ एका भव्य आणि उदात्त कल्पनेचा नाही, तर मूलतः तो अशी कल्पना प्रत्यक्षात आणण्याची स्नेहालय टीमची कल्पकता, चिकाटी, दृष्टी आणि सांघिक कार्य यांचा आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Viral Video : भारतातील ही अनोखी शाळा, जिथे फी भरली जात नाही, तर विद्यार्थ्यांना करावे लागते असे काही...