Onion News : सध्या राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दरात घसरण झाल्यामुळं नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. मुंबई ते आग्रा महामार्गावर कांदे फेकत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. मालेगावच्या मुंगसे बाजार समिती समोरील व्हिडिओ व्ह्यायरल झाला आहे. यामध्ये शेतकरी कांदे फेकून निषेध व्यक्त करत आहेत. 


कांद्याला भाव नसल्याने पुन्हा हतबल 


कष्टाने पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. निराश झालेल्या तरुण शेतकऱ्यांनी थेट नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मुंगसे उपबाजार समिती समोरच असलेल्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कांदे फेकून देत आपला संताप व्यक्त केला. हा व्हिडीओ  समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. रस्त्यावर कांद्याने भरलेले वाहने उभे करुन कांदे रस्त्यावर फेकल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी पुरता वैतागला आहे. अतिवृष्टी, गारपीट यामधून कसाबसा बाहेर पडणारा शेतकरी कांद्याला भाव नसल्याने पुन्हा हतबल झाला आहे.


कांदा उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर 


सर्व राज्यांमध्ये कांद्याची पेरणी केली जाते. राष्ट्रीय उत्पादनात सुमारे 43 टक्के वाट्यासह महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशचा 16 टक्के वाटा आहे. कर्नाटक आणि गुजरातचा वाटा सुमारे 9 टक्के आहे. खरीप हंगाम, खरीप हंगाम सरताना आणि रब्बी हंगामात असे वर्षातून तीन वेळा कांद्याचे पीक घेतले जाते. देशभरातील कांद्याच्या काढणीच्या वेळेमुळे वर्षभर ताज्या कांद्याचा नियमित पुरवठा होतो. परंतु काहीवेळा हवामानाच्या अनियमिततेमुळे एकतर साठवलेला कांदा खराब होतो किंवा पेरणी केलेल्या क्षेत्राचे नुकसान होते. ज्यामुळे पुरवठ्यात अडथळे येतात आणि देशांतर्गत किमती वाढतात.


गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले होते. याचा सर्वाधिक मोठा फटका नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला होता. नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका कांद्यासह इतर पिकांना बसला होता. फळबागांचेही मोठे नुकसान झाले होते. या फटक्यातून शेतकरी सावरत असतानाच आता कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे सहा दिवसात 23 हजार 699 हेक्टरवरील शेतीचे नुकसान, कांदा पिकाला सर्वाधिक फटका